रायगड किल्ल्याविषयी वस्तुनिष्ठ अहवाल ७ दिवसात हजर करा; जिल्हाधिकारी कल्याणकर यांचे आदेश
By जमीर काझी | Published: October 20, 2022 05:24 PM2022-10-20T17:24:40+5:302022-10-20T17:26:39+5:30
रायगड किल्ल्यावरील दुरवस्थेबाबत 'लोकमत' ने सोमवारी 'शिवरायांच्या समाधीचे पावित्र्य जपण्यात पुरातत्वची बेफिकिरी” या शिर्षकानव्ये वृत्त दिले होते.
अलिबाग - छत्रपती शिवाजी महाराज यांची राजधानी असलेल्या रायगड किल्ल्यावरील अनास्थेबाबत जिल्हा प्रशासनाला आता तत्पर झाले आहे गडावरील समाधी स्थित परिस्थिती व परिसरातील गैरसुविधा बाबत ७ दिवसात वस्तुनिष्ठ अहवाल सादर करावा, असे आदेश रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत.
रायगड किल्ल्यावरील दुरवस्थेबाबत 'लोकमत' ने सोमवारी 'शिवरायांच्या समाधीचे पावित्र्य जपण्यात पुरातत्वची बेफिकिरी” या शिर्षकानव्ये वृत्त दिले होते. गडावरील दुरावस्था, महाराजांच्या कथित श्वानाच्या चौथ्याऱ्याच्या रक्षणासाठी सुरक्षारक्षकांकडून ऐतिहासिक ओवरीचा वापर चौकीसारखा करणे, कपडे वाळविणे, स्वच्छतागृह उभारल्याने बकालपणा आला असल्याचे मांडले होते. त्याबाबत संशोधक व शिवप्रेमीच्यात संताप व्यक्त होत असल्याने
भविष्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची भीती नमूद केली होती. त्यामुळे पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी त्याच दिवशी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन सूचना दिल्या होत्या त्यानंतर आज जिल्हाधिकारी डॉ. कल्याणकर यांनी यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक, उपविभागीय दंडाधिकारी, भारतीय पुरातत्व सर्वेक्षण, उपविभाग महाडचे संरक्षण सहाय्यक यांना याबाबत आवश्यक पडताळणी व चौकशी करून, पुढील नियमोचित कार्यवाही तात्काळ करावी, तसेच बातमीच्या अनुषंगाने वस्तुस्थितीदर्शक अहवाल सात दिवसांच्या आत सादर करण्याविषयी सूचना केल्या आहेत.