पनवेल : गेल्या अनेक महिन्यांपासून वाहतूककोंडीमुळे त्रस्त असलेल्या तळोजेवासीयांना काहीसा दिलासा मिळणार आहे. कारण तळोजा रेल्वे फाटकाजवळील भुयारीमार्ग शुक्र वारी दुचाकी वाहनांसाठी खुला करण्यात आला आहे. या वेळी नगरसेवक हरेश केणी यांच्यासह त्रिंबक केणी, दिनेश केणी, रवि म्हात्रे, बबन केणी, विजय केणी, कैलास घरत आदी कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान, मुख्य भुयारीमार्गाचे काम येत्या दीड महिन्यांत पूर्ण होणार असून, त्या वेळी हा भुयारीमार्ग सर्व वाहनांसाठी खुला होईल, अशी माहिती देण्यात आली आहे.
तळोजा येथील रेल्वे फाटकावर नेहमी प्रचंड ट्राफिकचा सामना वाहनचालकांना करावा लागत आहे. ही वाहतूककोंडी एवढी प्रचंड असते की, त्यामुळे मुंब्रा-पनवेल महामार्गापर्यंत वाहनांच्या रांगा पोहोचतात व महामार्गावरसुद्धा मोठी वाहतूककोंडी होते. ही वाहतूककोंडी टाळण्यासाठी भुयारीमार्गाचे काम सुरू करण्यात आले; परंतु या भुयारीमार्गाचे काम पूर्ण होत नसल्याने वाहतूककोंडीचा प्रश्न कधीसुटणार, असा सवाल विचारला जात होता.
यासंदर्भात स्थानिक नगरसेवक हरेश केणी यांनी सिडकोविरोधात आंदोलनही पुकारले होते. त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून लवकरच चारचाकी वाहनांसाठीही लवकरच भुयारीमार्ग खुले होणार आहेत.