पेणमधील शेतकऱ्याच्या मुलींचे यश, दहावीच्या परीक्षेत जुळ्या बहिणींची कमाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2019 01:41 AM2019-06-11T01:41:02+5:302019-06-11T01:41:55+5:30
दहावी परीक्षेत तालुक्यात अदिती प्रथम : रावे गावातील जुळ्या बहिणींची कामगिरी
पेण : पेणच्या दुर्गम भागातील समुद्राच्या चारही बाजूंनी वेढलेल्या रावे मोराकोठा या समुद्रधुनीतील बेटावर असलेल्या दुर्गम गावातील शेतकरी व इलेक्ट्रिक व्यवसायाचे ठेकेदार रवींद्र पाटील यांच्या जुळ्या कन्यांनी पेण येथील सुमतीबाई विनायक देव विद्यालयात दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश संपादित करीत आपल्या आई-वडिलांसह प्रशालेच्या नावलौकिकात भर टाकणारी कामगिरी करून दाखविली आहे. या जुळ्या बहिणींपैकी अदिती पाटील हिने ९५.८० टक्के गुण संपादन करून प्रशालेत सेमी इंग्लिश माध्यमात प्रथम येण्याचा बहुमान मिळविला आहे. तर तिची भगिनी अपूर्वा हिने ८९.४० टक्के गुण मिळवीत आपल्या बहिणीच्या यशस्वी कामगिरीचा पाठलाग करण्याचा प्रयत्न करून आपणही कमी नसल्याचे दाखवून दिले आहे. उच्चतम श्रेणीत आलेल्या या दोन मुलींनी आपल्या गावाचा व कुटुंबाचा नावलौकिक केला असून ग्रामीण विभागातील शेतकऱ्यांच्या मुलींची ही यशस्वी कामगिरी शहरातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शक ठरेल अशीच आहे. त्यांच्या या कामगिरीचे सर्व स्तरातून अभिनंदन होत असून पेण तालुक्यातील मुलींमध्ये अदितीने प्रथम येण्याचा बहुमान संपादन केला आहे.
आई-वडील सुशिक्षित असल्याने या मुलींनी प्राथमिक शिक्षणापासून अतिशय परिश्रमपूर्वक अभ्यास करीत दहावीच्या परीक्षेत आपल्या आई-वडिलांच्या कष्टाचे चीज करून दाखविले आहे. अदितीने वैद्यकीय शाखेत जाण्याची इच्छा व्यक्त केली असून आता ती विज्ञान शाखेत अकरावीच्या वर्गात प्रवेश घेणार असल्याचे तिचे पालक रवींद्र पाटील यांनी सांगितले. मुलींनी नियमितपणे अभ्यास केल्याने त्यांना यश मिळणार हे आम्हाला ठाऊक होते. परंतु ९५.८० टक्के गुण संपादन करून व दुसरीने ८९.४० टक्के गुण मिळवून आम्हाला आश्चर्याचा धक्का दिला आहे. त्यांच्या या यशाने संपूर्ण कुटुंब आनंदित झालेले आहे. त्याचबरोबर आजपर्यंत आमच्या गावातून एवढे गुण कोणीही मिळविले नाहीत. त्यामुळे माझ्या दोन्ही मुलींचा माझ्या कुटुंबाला सार्थ अभिमान वाटत आहे.
दोन्ही मुलींच्या कामगिरीचा सार्थ अभिमान : सुमतीबाई वि. देव माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापक, सर्व शिक्षक व पेण शिक्षण महिला समितीच्या अध्यक्ष तसेच कमिटी मेंबर या सर्वांनी विद्यार्थ्यांवर घेतलेल्या मेहनतीमुळे या प्रशालेच्या इंग्रजी व मराठी माध्यमातील दहावीचा निकाल १०० टक्के लागला असल्याची रवींद्र पाटील यांनी शाळेबाबत बोलकी प्रतिक्रिया दिली. माझ्या दोन्ही मुलींचा माझ्या कुटुंबासह गावालाही त्यांच्या या कामगिरीचा सार्थ अभिमान वाटत आहे असे त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
आदिती पाटील
95.80%
अपूर्वी पाटील
89.40%