पनवेल : चिंध्रन येथील शेतकऱ्यांच्या सुपीक लागेतुन मुंबई ऊर्जा प्रकल्पाचे उच्च दाबाचे टॉवर बांधले जात असल्याचा आरोप करीत दि.28 रोजी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आमरण उपोषणाचा हत्यार उगारला होता. या उपोषण आंदोलनाची सांगता आठव्या दिवशी झाली. यावेळी ग्रामस्थांच्या जागेतुन हा प्रकल्प न नेता बाजुच्या गायरान जागेतुन या प्रकल्पाचे टॉवर उभारण्याचे लेखी आश्वासन या उपोषणकर्त्यांना देण्यात आले आहे.
दि.3 रोजी यासंदर्भात बैठक पार पडली.यावेळी प्रांत अधिकारी राहुल मुंडके,तहसीलदार विजय पाटील,ऍडव्होकेट सुरेश ठाकुर,शेकापचे अनिल ढवळे,मुंबई ऊर्जा प्रकल्पाचे सुरजित नारायण,जी आर पाटील,शिरीष घरत आदींसह उपोषणकर्त्या आंदोलकांचे प्रतिनिधी उपस्थित होते.चिंध्रन गावात शासनाची सुमारे 15 ते 16 एकर गायरान जागा आहे.सर्व्हे नंबर 31 मध्ये हि गायरान जागा आहे.मात्र असे असताना या प्रकल्पाकरिता गावातील सुमारे 50 ते 60 शेतकऱ्यांच्या सुपीक जागेतून मुंबई ऊर्जा प्रकल्पाचे बांधकाम केले जाणार असल्याने संतप्त ग्रामस्थांनी उपोषणाचे हत्यार उगारले होते.गायरान जागेतुन या प्रकल्पाचे टॉवर उभारले जाणार असुन शेतकऱ्यांची दुसरी मागणी गावठाण विस्ताराचा देखील प्रस्ताव सादर करण्याची सुचना यावेळी तहसीलदारांनी केली आहे.या मागण्यांसाठी 13 ग्रामस्थ उपोषणाला बसले आहेत. यामध्ये किरण कडू, सुजित पाटील, मनोज कुंभारकर, राम पाटील, विलास पाटील, मधुकर पाटील, शैलेश अरिवले, जयराम कडू, रुपेश मुंबईकर, बामा भंडारी, गणेश देशेकर, संतोष अरिवले, ताईबाई कडू आणि समीर पारधी आदींचा समावेश आहे.