नवी मुंबई : पोलीस कर्तव्य मेळाव्यात नवी मुंबई पोलिसांनी यशस्वी कामगिरी करून पदके मिळवली आहेत. त्यांच्या या यशाबद्दल पोलीस आयुक्तांकडून सर्व विजेत्यांचा सत्कार करण्यात आला. विशेष म्हणजे, सायन्टिफिक अॅड इन्व्हेस्टिगेशन या गटात प्रथमच विजेतेपद मिळाले आहे.
पुणे येथे १७ वा महाराष्ट्र राज्य पोलीस कर्तव्य मेळावा पार पडला. या मेळाव्यात पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्यात विविध प्रकारच्या गुन्ह्यांच्या तपासाकरिता आवश्यक असणारे व्यावसायिक नैपुण्य व कौशल्य यांची पडताळणी केली जाते. याच उद्देशाने हा मेळावा घेत त्याकरिता वेगवेगळ्या गटात स्पर्धा घेतल्या जातात. त्यानुसार यंदाच्या या कर्तव्य मेळाव्यात नवी मुंबई पोलिसांच्याही संघाने सहभाग घेतला होता. पोलीस आयुक्त संजय कुमार, सहायुक्त राजकुमार म्हटकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा उपआयुक्त प्रवीणकुमार पाटील, मुख्यालय उपायुक्त शिवराज पाटील यांच्या अधिपत्याखाली हा संघ तयार करण्यात आला होता. या संघाचे प्रशिक्षक म्हणून रबाळे एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक नितीन गीते यांनी स्पर्धकांना मार्गदर्शन केले होते. त्यानुसार तीन गटांत नवी मुंबई पोलिसांनी यश मिळवले आहे. सायन्टिफिक अॅड इन्व्हेस्टिगेशन या गटामध्ये सहायक पोलीस निरीक्षक अशोक फल्ले यांनी सर्वसाधारण विजेतेपद पटकावले आहे.
विशेष म्हणजे, या गटात प्रथमच नवी मुंबई पोलिसांना चषक मिळाले आहे. तर फॉरेन्सिक सायन्स गटातून पोलीस निरीक्षक मच्छींद्र खाडे यांनी रौप्य पदक पटकावले आहे. त्यांनी कायदा व कायदेशीर प्रक्रिया या विषयावर सादरीकरण केले होते. त्याचप्रमाणे क्राइम फोटोग्राफी या विषयात मनीषा काशिद यांच्यासह पोट्रेट पार्ले या विषयात पोलीस हवालदार चव्हाण यांनी कांस्य पदक पटकावले आहे. या सर्व विजेत्यांचा पोलीस आयुक्त संजय कुमार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यांच्या या कामगिरीबद्दल त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.