कोकणातील जंगल वणवे रोखण्यात यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2018 03:10 AM2018-04-12T03:10:25+5:302018-04-12T03:10:25+5:30

कोकणात सर्वत्र वर्षानुवर्षे डोंगर भागात वणवे लागून मोठ्या प्रमाणात नैसर्गिक वनसंपत्ती व वन्यजीवांची मोठी हानी होत असते. वनविभाग वा अन्य कोणतीही शासन यंत्रणा वणवे थांबविण्याकरिता कोणतीही उपाययोजना करण्यासाठी पुढे येताना दिसत नाही.

Success in preventing forests from Konkan | कोकणातील जंगल वणवे रोखण्यात यश

कोकणातील जंगल वणवे रोखण्यात यश

googlenewsNext

जयंत धुळप 
अलिबाग : कोकणात सर्वत्र वर्षानुवर्षे डोंगर भागात वणवे लागून मोठ्या प्रमाणात नैसर्गिक वनसंपत्ती व वन्यजीवांची मोठी हानी होत असते. वनविभाग वा अन्य कोणतीही शासन यंत्रणा वणवे थांबविण्याकरिता कोणतीही उपाययोजना करण्यासाठी पुढे येताना दिसत नाही. मात्र, भिवघरच्या तरुणांनी याकामी गेल्या २००७ मध्ये पुढाकार घेवून जंगल वणव्यांपासून आपल्या गावाचे आणि नैसर्गिक संपत्तीसह वन्यजीवांचे रक्षण करण्याचे धाडसी काम सुरू केले आणि आज त्यातून मोठे यश प्राप्त झाले आहे.
महाड तालुक्यात अत्यंत दुर्गम डोंगर भागात वसलेले भिवघर हे जेमतेम तीन हजार लोकसंख्येचे गाव. सारेच शेतकरी. डोंगराच्या कुशीत विसावलेल्या या गावाच्या शेजारील डोंगरावर २०१२ मध्ये एक मोठा जंगल वणवा लागला आणि पाहतापाहता तो खाली गावात येवून पोहोचला. त्यात जंगलाशेजारी राहणाऱ्या आदिवासींच्या १० ते १२ झोपड्या त्यातील संसारासह जळून भस्मसात झाल्या. त्या आदिवासी कुटुंबांचे संसार उघड्यावर आले. याच दुर्दैवी घटनेअंती ग्रामस्थ आणि काही तरुणांनी यापुढे वणवा लागूच द्यायचा नाही आणि लागलाच तर पुन्हा आपल्या गावापर्यंत पोहचू द्यायचा नाही असा पक्का निर्धार केला आणि त्या कामाला सुरुवात केल्याचे वणवा आणि वृक्षतोड प्रतिबंध उपक्रम अमलात आणलेल्या भिवघर वनप्रेमी संघटनेचे प्रमुख किशोर पवार यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
जंगलातील जाळ रेषा व पाण्याच्या टाक्यांतून
वणवे नियंत्रण मिळवण्यात यश
वणवा आणि वृक्षतोड प्रतिबंध उपक्रमाचे स्वरूप सांगताना पवार म्हणाले, उन्हाळ्याच्या दिवसात गावापासून जवळच असलेल्या डोंगरावर ४ ते ५ किलोमीटरची पायपीट करून तरुण मंडळी जातात. जाताना डोक्यावर पाण्याचे ड्रम घेवून जातात. तेथे संभाव्य वणव्याच्या जाळरेषा आखल्या जातात. जाळरेषा म्हणजे, वणवा लागलाच तर इतरत्र पसरू नये यासाठी डोंगरमाथ्यावरील वाढलेले गवत एका ठरावीक अंतरावर कापले जाते. तेथे पडलेला सुका पालापाचोळा उचलला जातो. त्यामुळे वणवा पेटलाच तर पुढे पसरत नाही. शिवाय तेथे छोट्या पाण्याच्या साठवण टाक्या बांधल्या आहेत त्यात सोबत नेलेल्या ड्रममधील पाणी साठवून ठेवले जाते. चुकून कधी वणवा लागलाच तर तो विझवण्यासाठी त्या पाण्याचा वापर करता येतो.
उन्हाळ्याच्या पाणीटंचाईच्या दिवसात वरच्या जंगल भागात वावरणाºया वन्यजीवांची तहान या साठवण टाक्या भागवतात आणि ते वन्यप्राणी गावांत येत नाहीत. तरुणांच्या या अभिनव उपक्रमामुळे वणवे रोखले जावून वनसंपदा टिकून राहिली आहे. या भागातील लोक जंगलातून आंबे(कैरी) आणून विक्रीचा व्यवसाय करतात. वणवे रोखल्यामुळे जंगलभागात पिकणारा रानमेवाही वाचला आहे. त्यातून स्थानिकांना चांगला रोजगारही उपलब्ध झाला आहे. गेल्या बारा वर्षातील सातत्यपूर्ण प्रयत्नांती दिसेनासे झालेले प्राणी-पक्षी जंगलात पुन्हा वास्तव्यास आले आहेत.
वनविभाग वा शासकीय यंत्रणेस मात्र
कल्पना नाही
सद्यस्थितीत भिवघरचा संपूर्ण परिसर हिरवळीने नटलेला दिसतो. मोर, ससे, भेकर यासारखे प्राणी, असंख्य पक्षी पुन्हा या परिसरात दिसू लागले आहेत. संपूर्ण परिसर रान, वृक्ष, वेलींनी भारून गेला आहे. विहिरी, तलावांची पाण्याची पातळी वाढली, आदिवासी बांधवांना रोजगार मिळू लागला. ही निसर्गाची कृपा असली तरी खरी किमया या तरुणांच्या वणवा विरोधी अभियानाचीच आहे, याची दखल मात्र अद्याप वनविभाग वा कोणत्याही शासकीय यंत्रणेने घेतलेली नाही.
नैसर्गिक जलपातळीत वाढ, पाणी टँकर बंद
वणवे आणि वृक्षतोड थांबल्याने जमिनीतील नैसर्गिक जलपातळी वृद्धिंगत होवून, गावातील विहिरींच्या जलपातळीत वाढ झाली आहे. पावसाळा सुरू होईपर्यंत विहिरींना पाणी असते. परिणामी उन्हाळी पाणीटंचाई अंतर्गत गावाला टँकरने पाणीपुरवठा करावा लागत नसल्याचे भिवघर वनप्रेमी संघटनेचे श्याम गायकवाड यांनी सांगितले.
गेल्या पाच वर्षांत जंगलात वणवा नाही
किशोर पवार आणि श्याम गायकवाड या जिद्दी तरुणांच्या सोबतीने गावातील तरुण व आदिवासी यांची वनप्रेमी संघटना उभी राहिली आणि वणव्याशी झुंज सुरू झाली. रात्री ९ ते १२ या वेळेस जंगलात जावून जाळ रेषा मारून वणवा पसरण्याची प्रक्रिया त्यांनी खंडित केली. आता वणवा पूर्णपणे थांबला आहे. मध्येच कधी वणवा लागला तर गावांतील आदिवासी व तरुण तत्काळ जंगलात धावत जावून त्यावर नियंत्रण मिळवितात. गेल्या पाच वर्षांपासून जंगल वणव्यापासून दूर ठेवून या तरुणांनी एक आगळा आदर्शच निर्माण केला.

Web Title: Success in preventing forests from Konkan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.