महाड : महाडमध्ये तांबडभुवन परिसरात शुक्रवारी रात्री नागरिकांच्या खवले मांजर दृष्टिक्षेपात आल्यानंतर सिस्केपच्या योगेश गुरव यांना घटनास्थळी पाचारण करण्यात आले. खवले मांजर हा वन्य प्राणी अधिनियमाप्रमाणे शेड्यूल १ मध्ये येत असल्याने त्यास वनविभागाच्या ताब्यात देऊन त्याची योग्य ती सुरक्षितता करण्यात आली. तांबडभुवन नागरिकांच्या सजगतेविषयी सर्वत्र कौतुक होत आहे.
महाडमध्ये खवले मांजर सापडण्याची ही पाचवी वेळ आहे. साधारण सावित्री नदीपलीकडील कोल आणि विन्हेरे विभाग तसेच रायगड खोरे आणि पूर्वेकडील महाबळेश्वर येथील जंगलातून भरपूर पावसामुळे होणारे भूस्खलन, प्रचंड धूप, तसेच पूर आदी अनेक भौगोलिक दुर्घटनांमुळे नदीपात्राच्या मार्गाने खवले मांजर स्थलांतर करत असावेत. महाडमधील वेताळवाडी तांबड भुवन परिसरात शुक्रवारी रात्री ७.३० सुमारास तेथील ग्रामस्थांना हा प्राणी निदर्शनास आला. त्याला ओळखणे आणि हाताळणे कोणास जमत नसल्याने त्यांनी सिस्केप संस्था सदस्य योगेश गुरव, चिंतन वैष्णव, ओम शिंदे आणि चिराग मेहता यांना पाचारण केले. घटनास्थळी पोहोचून त्यांनी तो महाड वनविभागाच्या पी. डी. जाधव, वनपाल विजयकांत पवार यांच्या ताब्यात पुढील देखरेख आणि वैद्यकीय तपासणीकरिता सुपूर्द केले.पुढील तपासणी महाड वनविभाग वनक्षेत्रपाल प्रशांत शिंदे आणि पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. सोनावणे यांनी सिस्केप संस्था सदस्य प्रीतम सकपाळ आणि प्रेमसागर मेस्त्री तसेच सह्याद्री मित्रचे अध्यक्ष डॉ. राहुल वारंगे आदीच्या उपस्थितीत करण्यात आली.
या प्राणी सुस्थितीत असल्याने त्यास सुरक्षित ठिकाणी पुन्हा निसर्गात सोडण्याची कार्यवाही महाड वनविभाग, सिस्केप आणि सह्याद्री मित्र महाड संस्था पदाधिकारी यांच्या साक्षीने करण्यात येईल, असे प्रतिपादन प्रेमसागर मेस्त्री यांनी केले. तर सर्व तांबड भुवन तरुण मित्रमंडळ आणि वेताळवाडी ग्रामस्थांच्या सजगतेबद्दल कौतुक करण्यात आले.तस्करी किंवा शिकार करणे कायद्याने गुन्हाखवले मांजर बाळगणे, वाहतूक करणे वा इतर कोणत्याही प्रकारे त्याची तस्करी किंवा शिकार करणे कायद्याने गुन्हा आहे, हे माहीत असतानाही आशिया खंडातील भारत, चीन, व्हिएतनाम, मलेशिया, बांगलादेश, थायलंड, म्यानमार तसेच आफ्रिका आदी देशांत त्याची तस्करी, शिकार सर्वाधिक केली जाते. चीन आणि व्हिएतनाम या देशांत तसेच भारतातील उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश आदी भागात खवले मांजराची कातडी, खवले, हाडे तसेच मांस यासाठी आणि जादूटोणा प्रकाराकरिता भरपूर मागणी असल्याने त्याची तस्करी व शिकार केली जाते. खवल्यांपासून औषध तयार करण्यासाठी चीन, व्हिएतनाम, बांगलादेशामध्ये हा प्राणी आंतरराष्ट्रीय तस्करीसंदर्भात पहिल्या क्रमांकावर आहे.