रायगडमध्ये स्ट्रॉबेरी शेतीचा यशस्वी प्रयोग; महाबळेश्वरपेक्षा जास्त गोड फळ असल्याचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2021 01:42 AM2021-01-29T01:42:24+5:302021-01-29T01:42:37+5:30

पनवेलमध्ये पिकलेली ही स्ट्रॉबेरीची फळे महाबळेश्वरपेक्षा जास्त गोड असल्याचा दावाही पवार यांनी केला आहे.

Successful experiment of strawberry cultivation in Vavanje village in Panvel taluka; Sweeter fruit than Mahabaleshwar | रायगडमध्ये स्ट्रॉबेरी शेतीचा यशस्वी प्रयोग; महाबळेश्वरपेक्षा जास्त गोड फळ असल्याचा दावा

रायगडमध्ये स्ट्रॉबेरी शेतीचा यशस्वी प्रयोग; महाबळेश्वरपेक्षा जास्त गोड फळ असल्याचा दावा

Next

वैभव गायकर 

पनवेल : स्ट्रॉबेरी म्हटले की साहजिकच महाबळेश्वरचे नाव सर्वांसमोर येते. मात्र पनवेल तालुक्यातील शेतकऱ्याने पनवेलमध्ये स्ट्रॉबेरीचे पीक घेऊन हा प्रयोग यशस्वी करून दाखविला आहे.

वावंजे गावातील सज्जन पवार यांनी हा प्रयोग वावंजे परिसरातील श्रीमलंग गड डोंगराच्या पायथ्याशी ७ गुंठे जागेत राबविला आहे. पनवेलमध्ये खांदेश्वरमध्ये भरलेल्या कृषी प्रदर्शनात महाड येथील शेतकऱ्याने हा प्रयोग राबविल्याची माहिती शेतकरी सज्जन पवार यांना मिळाली होती. त्यांनी संबंधित शेतकऱ्यांकडून प्रत्यक्ष स्ट्रॉबेरीच्या शेतीची माहिती घेऊन पनवेलमध्ये आपल्या शेतात हा प्रयोग राबविण्याचे निश्चित केले. याकरिता जागेची मशागत करून स्ट्रॉबेरीच्या शेतीसाठी आवश्यक असलेले मलचिंग बेड (गादीवाफे) तयार केले. याकरिता उभ्या आडव्या पद्धतीने २५ मायक्रॉनचे मलचिंग पेपर लावले. परदेशातून भारतात आलेली स्ट्रॉबेरीची शेती महाराष्ट्रात महाबळेश्वरमध्ये प्रसिद्ध आहे. या ठिकाणाहूनच सज्जन यांनी १ हजार रोपे पनवेलमध्ये आणली. विंटर डॉन आणि स्वीट चार्ली या जातीची ही रोपे आहेत. महाबळेश्वरला सात रुपये प्रति रोप प्रमाणे हे स्ट्रॉबेरीचे रोप पवार यांना मिळाले. नोव्हेंबरमध्ये त्यांनी या रोपांची लागवड केली. 
दरम्यान, दोन वेळा अवकाळी पाऊस पडूनही स्ट्रॉबेरीचा प्रयोग यशस्वी झाल्याने पनवेलकरांना स्ट्रॉबेरी चाखायला मिळणार आहे. श्रीमलंग गड परिसरात वातावरण थंड असल्याने येथील वातावरण स्ट्रॉबेरीसाठी पोषक असल्याचे सिद्ध झाल्याने भविष्यात पनवेलमध्ये स्ट्रॉबेरीची शेती मोठ्या प्रमाणात घेता येऊ शकते. पनवेलमध्ये पिकलेली ही स्ट्रॉबेरीची फळे महाबळेश्वरपेक्षा जास्त गोड असल्याचा दावाही पवार यांनी केला आहे.

१५ दिवसांत फळे पिकल्यावर काढणी

स्ट्रॉबेरीच्या उत्तम वाढीसाठी भरपूर सूर्यप्रकाश आणि १०-२५ अंश सेल्सिअस तापमान पोषक ठरते. परदेशातून आयात केलेल्या (कॅलिफोर्निया) जातींना सरासरी ३० ते ३७ अंश सेल्सिअस तापमान, ६० ते ७० टक्के हवेतील आर्द्रता आणि भरपूर सूर्यप्रकाश चांगले मानवते. १५ ते २० दिवसांत फळे पिकल्यावर त्यांची काढणी केली जाईल. 

पनवेलमध्ये स्ट्रॉबेरीचा प्रयोग यशस्वी झाल्याने मी खूप आनंदित आहे. शेतकऱ्याने प्रयोगशील असावे या हेतूने मी हा प्रयोग राबविला. हा प्रयोग यशस्वी झाल्याने पनवेलमध्येदेखील स्ट्रॉबेरी पिकू शकते हे सिद्ध झाले आहे. तालुक्यातील इतर शेतकऱ्यांनीदेखील हा प्रयोग राबवावा. - सज्जन पवार, शेतकरी,वावंजा गाव 

 

Web Title: Successful experiment of strawberry cultivation in Vavanje village in Panvel taluka; Sweeter fruit than Mahabaleshwar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.