शुद्ध श्वासासाठी यशस्वी संशोधन; अंजली पुराणिक यांचा जागतिक स्तरावर गौरव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2019 11:29 PM2019-06-04T23:29:11+5:302019-06-04T23:29:33+5:30
डॉ. अंजली पुराणिक या भारतीय महिला संशोधिकेने जागतिक पर्यावरणदिनी आपल्या अथक प्रयत्नातून संपूर्ण विश्वाला शुद्ध श्वासाची दिलेली आगळी भेट म्हणावी लागेल.
जयंत धुळप
अलिबाग : पाली येथील जे. एन. पालीवाला कॉलेजमधील रसायनशास्त्राची प्राध्यापिका म्हणून केवळ नोकरी न करता महाविद्यालयातील अध्यापन ते स्वयंपाकघर अशा सर्व कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळून डॉ. अंजली पुराणिक यांनी गेली आठ वर्षे सलग, जिद्दीने केलेले ‘ए ग्रीन अॅप्रोच टू क्लिन इंडस्ट्रियल एमिशन्स’ हे संशोधन पृथ्वीवरील मानवास शुद्ध ऑक्सिजनचा खात्रीने श्वास देण्यात यशस्वी झाले आहे.
शनिवार, १ जून रोजी इस्राईल येथे ‘इंटरनॅशनल बोर्ड फॉर एज्युकेशन, रिसर्च अॅण्ड डेव्हलपमेंट’च्या वतीने आयोजित जागतिक विज्ञान परिषदेत प्रा. डॉ. अंजली पुराणिक यांच्या या संशोधनाचे कौतुक होऊन त्यांना गौरवित करण्यात आले. डॉ. अंजली पुराणिक या भारतीय महिला संशोधिकेने जागतिक पर्यावरणदिनी आपल्या अथक प्रयत्नातून संपूर्ण विश्वाला शुद्ध श्वासाची दिलेली आगळी भेट म्हणावी लागेल.
औद्योगिक प्रदूषणामध्ये धूलिकण, हरितवायू, आम्ल गुणधर्म असलेले वायू यांचा समावेश होतो. बहुतेक सर्व कंपन्यांमध्ये बाहेर सोडल्या जाणाºया वायूंमधून कण बाजूला केले जातात; परंतु हरितवायू व आम्ल वायू मात्र मोठ्या प्रमाणात वातावरणात सोडले जातात. यामुळे वैश्विक तापमान वेगाने वाढते. हे घातक वायू त्यांच्या उगमस्थानीच थांबविण्यासाठी डॉ. पुराणिक यांनी ‘ए ग्रीन अॅप्रोच टू क्लिन इंडस्ट्रियल एमिशन्स’ या प्रकल्पाची आपल्या संशोधनातून निर्मिती केली आहे. यामध्ये एक नावीन्यपूर्ण मिश्रण तयार करण्यात आले असून व त्यामधून हे प्रदूषण निर्माण करणारे वायू पाठविले जातात. तेथे शोषण (अॅडसॉर्पश) प्रक्रियेच्या मदतीने हे वायू थांबविण्यात हा प्रकल्प यशस्वी झाला. येत्या काळात देशातील विविध रसायन निर्मिती कारखान्यांतील प्रदूषण थांबवून १०० टक्के ऑक्सिजनकरिता हा प्रकल्प उपयोगात आणला जाईल, असा विश्वास संशोधक डॉ. पुराणिक यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला.
जागतिक पर्यावरण दिनाच्या पार्श्वभूमीवर डॉ. पुराणिक यांच्या कुटुंबाशी संवाद साधून गेल्या आठ वर्षांतील या संशोधनामागील सर्व बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता, संशोधनाव्यतिरिक्त डॉ. अंजली पुराणिक आणि त्यांचे पती पालीवाला कॉलेजचे उपप्राचार्य आणि मुंबई विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक प्रा. सुधीर पुराणिक यांनी घराच्या गच्चीत उभ्या त्यांच्या ‘ए ग्रीन अॅप्रोच टू क्लिन इंडस्ट्रियल एमिशन्स’ हा अत्याधुनिक यंत्रणायुक्त प्रकल्पासाठी २२ लाख रुपये खर्च आल्याचे सांगितले.
खरेतर पैसे उभे करणे हे मोठे अवघड काम होते; परंतु डॉ. अंजली यांचा संशोधन निश्चय आणि जिद्द पाहता, हा संशोधन प्रकल्प मी, आमचे दोन्ही चिरंजीव आदित्य व सलिल अशा आमच्या संपूर्ण कुटुंबाचाच झाला आणि पैसे उभे करायचेच, असा निर्णय घेतला. प्रारंभी पालीमधील बँक ऑफ इंडियाने शैक्षणिक कर्ज दिले आणि संशोधनाचा पहिला टप्पा पुढे सरकला. त्यानंतर सहकारी बँक आणि पतसंस्थेतून कर्ज घेतल्याचे प्रा.पुराणिक यांनी सांगितले.
संशोधनासाठी के.जे. सोमय्या महाविद्यालयाच्या डॉ. भानू रामन यांचे मार्गदर्शन लाभले. मुंबई विद्यापीठ विद्यार्थी विकास मंडळाचे
संचालक डॉ. सुनील पाटील यांनी संशोधनावर दाखविलेला विश्वास, जे. एन. पालीवाला महाविद्यालयाचे प्राचार्य युवराज महाजन व सुधागड एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष वसंत ओसवाल यांचे प्रोत्साहन व कुटुंबीयांचे सहकार्य यामुळेच हे संशोधन यशस्वीरीत्या पूर्ण करू शकल्याचे डॉ. पुराणिक यांनी सांगितले.
सकारात्मक प्रतिसादाने जबाबदारीचे भान राहिले आणि उत्साह वाढत गेला
संशोधन प्रकल्पासाठी वापरलेली सगळी उपकरणे गरजेनुसार बनविलेली आहेत. नेहमी साधारणपणे कोणताही उत्पादक आपल्या उत्पादनात बदल करायला तयार नसतो; पण या प्रकल्पादरम्यान ज्यांच्या ज्यांच्याकडे गेले त्यांनी सर्व प्रकारची मदत तर केलीच आणि सदैव पुढील सहकार्यासाठी तत्पर राहिल्याचे डॉ. अंजली पुराणिक यांनी सांगितले. मॉनिटर्स बनविणारे यादव व त्यांचे सहकारी कायम हवे ते बदल करून देत होते. मीटर कॅलिब्रेशनचे अथवा दुरु स्तीचे त्यांनी कधीच पैसे घेतले नाहीत, असा प्रतिसाद मिळत गेल्याने जबाबदारीचे भान राहिले आणि उत्साह वाढत गेल्याचे डॉ. पुराणिक यांनी सांगितले.
पती आणि दोन चिरंजीवांचा सहभाग : संशोधन काम करीत असताना प्रकल्पातील भट्टी एकदा पेटविली की निरीक्षणे सलग १२-१२ तास घ्यावी लागायची व त्यानंतर आतल्या मिश्रणाचे रासायनिक पृथक्करण करण्यासाठी पुढील वेळ लागायचा. त्यामुळे सकाळी भट्टी पेटविली की, सलग कोणीतरी १२ तास घराच्या गच्चीवर थांबावे लागत असे. त्यानंतर डॉ. पुराणिक दोन-तीन तास प्रयोगशाळेत निरीक्षणे घेणार. हे सगळे करीत असताना आमचे दोन्ही चिरंजीव आदित्य व सलिल हे खूप मदत करीत असत; पण घरातील स्वयंपाकासह कॉलेज सांभाळत संशोधनाची कसरत डॉ. पुराणिक यांना करावी लागत असे; परंतु ध्येयपूर्तीच्या जिद्दीपुढे त्या या कसरतीमुळे आठ वर्षांत कधीही थकल्या नाहीत.