जयंत धुळप
अलिबाग : भात उत्पादनात अग्रेसर असल्याने एके काळी रायगड जिल्ह्यास भाताचे कोठार म्हणून ओळखले जायचे; परंतु अनेक कारणास्तव जिल्ह्याचा हा नावलौकिक संपुष्टात आला असतानाच, कोकणातील खाऱ्या हवामानाच्या प्रदेशात गव्हाच्या अत्यंत पौष्टिक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘बन्सी’ या प्रजातीच्या गव्हाचे उत्पादन चांगल्या प्रकारे येऊ शकते हे अलिबाग तालुक्यांतील पळी-चरी येथील शेतकरी शशिकांत थळे यांनी प्रत्यक्ष उत्पादन घेऊन सिद्ध करून दाखविले आहे.
गव्हाचे शरबती, बन्सी व खपली अशा तीन मुख्य प्रजाती आहेत. त्यांची शास्त्रीय नावे वेगवेगळी आहेत. यातील शरबती गव्हाची लागवड व उपयोग मोठ्या प्रमाणात करण्यात येतो. मात्र, अधिक पौष्टिक असणाऱ्या बन्सी व खपली गव्हाची लागवड कमी प्रमाणात होते. बन्सी गव्हामध्ये प्रथिने व बीटा कॅरोटीन या पौष्टिक तत्त्वांचे प्रमाण अधिक आहे, तसेच त्यांच्यात जास्त लवचिक ग्लूटेन आहेत. परदेशात बन्सी गव्हाला मोठी मागणी आहे.
पद्मश्री सुभाष पाळेकर हेदेखील बन्सी गव्हाची लागवड करण्याबाबत शेतकऱ्यांना आवाहन करत असतात. गव्हाच्या पिकाला अधिक थंडीची गरज असते, त्यामुळे देशावर गव्हाची लागवड अधिक प्रमाणात होते. कोकण हा भाग समुद्रकिनारी असल्याने खारे वारे व मतलबी वारे यामुळे थंडीचे कमी प्रमाण असे प्रतिकूल वातावरण येथे असते. शशिकांत थळे यांनी यावर्षी हिवाळ्यात बन्सी गव्हाची लागवड प्रायोगिक तत्त्वावर करण्याचा निर्णय घेतला आणि अत्यंत चांगले पीक त्यांनी घेतले आहे.
मूळ चरी येथील आणि शासनाच्या सेवेत समाजकल्याण उपायुक्त म्हणून कार्यरत प्रमोद जाधव यांनी बन्सी गव्हाचे बियाणे परभणी येथून थळे यांना उपलब्ध करून दिले. गव्हाचा दाणा कणसातून बाहेर काढण्यासाठी लागणारे ‘मोगरी’ हे लाकडी साधन आवश्यक असते, ते जाधव यांनी अहमदनगर येथून उपलब्ध करून दिले. मोगरी हे साधन स्थानिक सुताराकडून देखील तयार करून घेता येऊ शकते.
यंदाच्या पिकातील कणसे जतन करून पुढील वर्षाच्या बियाण्यांकरिता वापरणारथळे यांनी डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात बन्सी गव्हाची लागवड केली. लागवडीनंतर दहा-दहा दिवसांनी गरजेनुसार पिकाला पाणी दिले. त्यांच्या आईने त्यांना या कामात साथ दिली. थळे हे या कणसातील टपोरी कणसे बाजूला काढून पुढील वर्षी बियाण्यांकरिता वापरणार असल्याचे त्यांनी सांगितले. थळे हे भाताबरोबरच तोंडली, कारली, दुधी, वाल, मूग, चवळी, हरभरा, वांगी, मुळा अशा विविध प्रकारच्या पिकांची लागवड करून उत्पादन घेत असतात.पळी-चरी येथील शेतकरी शशिकांत थळे यांनी खाऱ्या हवामानात गहू पिकवला असून त्यांची ही प्रयोगशीलता कोकणातील विशेषत: खारेपाटातील शेतकऱ्यांना निश्चितच पथदर्शी ठरू शकणार आहे.