नागोठणे : चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ज्वालाग्राही रसायन भरलेला टँकर रस्त्यातच पलटी झाल्याने वाहतूक पूर्णपणे बंद झाली होती. हा अपघात शुक्रवारी सायंकाळच्या दरम्यान मुंबई-गोवा महामार्गावर सुकेळी खिंडीच्या चढणीवर घडला होता. साधारणत: ३० टन इथिलीन ड्राय क्लोराइड भरलेला (जीजे १२ ए झेड ८६८४) बाराचाकी टँकर हाजिरा, गुजरातहून घर्डा केमिकल्स, लोटे, चिपळूणकडे चालला असताना रस्त्यातच पलटी झाला.टँकर रस्त्याच्या मधोमधच पलटी झाल्याने महामार्गावरील ठप्प झालेली महाड व मुंबईकडे जाणारी वाहतूक आमडोशी-भिसे खिंड-रोहे-कोलाडमार्गे वळविण्यात आली होती. अपघातामुळे खिंडीच्या दोन्ही बाजूला रांगा लागल्या होत्या.टँकरमधून रसायनाची गळती होण्याची शक्यता असल्याने खबरदारीचा उपाययोजना म्हणून नागोठणे रिलायन्स, सुप्रीम पेट्रोकेम, घर्डा केमिकल्सच्या रासायनिक क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळींसह अग्निशमन दल अपघातस्थळी तैनात ठेवण्यात आले होते व त्यांनी निर्णय घेतल्यानंतर मध्यरात्री १.३०चे सुमारास क्रेन आणि हायड्रा या यंत्रांसह टँकर उचलून तो उभा करण्यात आला. टँकर बाजूला घेतल्यानंतर पहाटे ३.३० वाजता या मार्गावरील वाहतूक पुन्हा सुरू करण्यात आली.
सुकेळी खिंडीतील वाहतूक सुरळीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2017 3:26 AM