अवकाळी पावसाने झोडपले
By admin | Published: November 22, 2015 12:33 AM2015-11-22T00:33:11+5:302015-11-22T00:33:11+5:30
तालुक्यात शनिवारी सायंकाळी अचानक कोसळलेल्या पावसाने तालुक्यातील भातमळणी करणाऱ्यांची दाणादाण उडाली असून, अचानक जोरदार कोसळणाऱ्या पावसाने शेतकऱ्यांच्या
पोलादपूर : तालुक्यात शनिवारी सायंकाळी अचानक कोसळलेल्या पावसाने तालुक्यातील भातमळणी करणाऱ्यांची दाणादाण उडाली असून, अचानक जोरदार कोसळणाऱ्या पावसाने शेतकऱ्यांच्या सुरू असलेल्या भाताच्या मळणीवर पावसाच शिडकावा होऊन भाताच्या मळणीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
श्रीवर्धन तालुक्याला अवकाळी पावसाने झोडपले. वादळी वाऱ्यासह विजेचा कडकडाट होऊन पावसाने दमदार हजेरी लावली. त्यामुळे बेसावध असलेल्या शेतकऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली. शेतीची कापणी होऊन काही शेतकऱ्यांनी भाऱ्याची उडवी शेतावर रचून ठेवली होती. तर काहींनी गुरांसाठी लागणारे पेठे ठेवले होते. परंतु अचानक पावसाचे आगमन झाल्याने शेतकऱ्यांची एकच ताराबंळ उडाली. काही शेतकऱ्यांची मळणी चालू असून, भात पूर्णपणे भिजून गेला आहे. वर्षभर शेतात काबाडकष्ट करून शेतकऱ्यांच्या घरी लक्ष्मी येणार, तोच अवकाळी पावसाने त्यावर पाणी फेरल्याने शेतकऱ्यांची पुरती निराशा झाली आहे. या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील वीटभट्ट्यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
पावसाळा संपून आता हिवाळा लागला असला तरी दिवसाचे तापमान कमी व्हायचे नाव घेत नाही. तापमानाचा पारा ३५ ते ३८ अंशापर्यंत पोहोचत असल्याने हिवाळ्यात उकाड्याबरोबर उन्हाचे चटके बसत आहेत. मात्र आज दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास ढग जमा झाले आणि पावसाला सुरुवात झाली. पनवेल, नवीन पनवेल, खांदा वसाहत, कळंबोली, कामोठे परिसरात सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली होती. त्याचबरोबर रस्त्यावरसुद्धा पाणीच पाणी दिसू लागले. पनवेल- सायन महामार्गावर कळंबोली, कामोठे आणि कोपरा टोलनाका परिसरात पाणी साचले होते. त्यामुळे वाहने चालविण्यास चालकांना कसरत करावी लागत होती. त्याचबरोबर पनवेल शहरात उड्डाणपुलाखाली अमरधाम स्मशानभूमीजवळ महामार्गावर पाणी साचले होते. अचानक आलेल्या पावसामुळे पादचारी, दुचाकीस्वारांची त्रेधातिरपीट उडाली.
छत्र्या, रेनकोट नसल्याने अनेकांना ओलेचिंब व्हावे लागले. बच्चेकंपनीने पावसात भिजण्याचा पावसाळ्याप्रमाणे आनंद लुटला. कळंबोली सर्कल आणि पनवेल शहरालगतच्या पुलाखाली अनेक जण पाऊस उघडण्याची वाट पाहात होते. मात्र संध्याकाळपर्यंत पाऊस थांबण्याचे नाव घेत नसल्याने पावसात भिजत जाणे कित्येकांनी पसंत केले. तिसरा शनिवार असल्याने कार्यालयीन कामकाज सुरू होते.
संध्याकाळी चाकरमान्यांना घरी जाण्याकरिता उशीर झाला. द्रुतगती महामार्गावरसुद्धा वाहतूक काही प्रमाणात मंदावली होती. त्याचबरोबर हर्बर लाइनवरील लोकल सेवा नेहमीपेक्षा स्लो झाली.