लोकमत न्यूज नेटवर्कअलिबाग : समुद्रकिनाऱ्यावरील बंधाऱ्यावरील दोन बोटींना अचानक आग लागून खाक झाल्याची घटना सारळ येथील किनाऱ्यावर घडली. या दुर्घटनेत सुदैवाने कोणीही जखमी झाले नसले तरी बोट जळाल्याने २५ लाखांच्या साहित्याची हानी झाली आहे. आगीचे नेमके कारण समजू शकले नसल्याचे अग्निशमन दलाच्या सूत्रांनी सांगितले.
मच्छीमारीसाठीच्या दोन बोटी सारळ येथील किनाऱ्यावर लावल्या होत्या. दोन्ही बोटींचे काम सुरू होते. सोमवारी दुपारी अडीचच्या सुमारास अचानक जुन्या बोटीत भडका उडून आग लागली. काहीवेळातच आगीच्या ज्वाळा सर्वत्र पसरल्या. बाजूची दुसरी बोटही त्याच्या विळख्यात सापडली. बोटीतील कर्मचारी तातडीने बाहेर पडल्याने ते बचावले.
आरसीएफ कंपनीच्या अग्निशमन दलाला मांडवा पोलिसांनी पाचारण केले. जवानांनी ४० मिनिटांत आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र तोपर्यंत दोन्ही बोटी जळून खाक झाल्या होत्या. दोन्ही बोटी नितीन पाटील यांच्या मालकीच्या असल्याचे सांगण्यात आले.