सुधागड किल्ल्याचे झाले वादळामुळे प्रचंड नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2020 11:56 PM2020-06-12T23:56:59+5:302020-06-12T23:57:27+5:30
मंदिरांवरील छत उडाले : वाड्याची भिंतही कोसळली; वृक्ष उन्मळून पडले
नामदेव मोरे
नवी मुंबई : निसर्ग चक्रीवादळामुळे रायगड जिल्ह्यातील सुधागड किल्ल्यावरही प्रचंड नुकसान झाले आहे. गडावरील मंदिरांचे छत उडाले आहे. एक मंदिरावर वृक्ष कोसळला आहे. पंतसचिवांच्या वाड्याची भिंतही कोसळली असून पायवाटेसह सर्वत्र वृक्ष उन्मळून पडले आहेत. या संकटाने खचून न जाता गडावरील मंदिरांची व इमारतींची डागडुजी करून गडास पुन्हा गतवैभव मिळवून देण्याचा संकल्प शिवप्रेमी नागरिकांनी केला आहे.
रायगड जिल्ह्यातील प्रमुख ऐतिहासिक वारसास्थळांमध्ये सुधागड किल्ल्याचाही समावेश होतो. स्वराज्याची राजधानी करण्यासाठीही या किल्ल्याचा विचार करण्यात आला होता. छत्रपती संभाजी महाराज व औरंगजेबाच्या मुलाची भेट याच किल्ल्याच्या पायथ्याशी झाली होती. या किल्ल्याचे ऐतिहासिक महत्त्व टिकवून येथील मंदिरांसह ऐतिहासिक वास्तूंचे जतन करण्यासाठी बा रायगड परिवार संस्थेच्या वतीने चार वर्षांपासून संवर्धन मोहिमांचे आयोजन केले जात आहे. महिन्यातून किमान दोन रविवार संस्थेचे शिलेदार संवर्धनाचे काम करत आहेत. नुकत्याच आलेल्या वादळाने होत्याचे नव्हते झाले. शिवप्रेमींनी अथक परिश्रम करून उभारलेल्या शिवमंदिर व गजलक्ष्मी मंदिराचे छत उडाले. भिंतींना तडे गेले. गडावरील पंतसचिवांच्या वाड्याची भिंतही कोसळली. पुरातन भोराई देवी मंदिराचेही संपूर्ण छत उडाले आहे. वाड्याजवळ असलेल्या मंदिरावरही वृक्ष कोसळला आहे. गडावरील दोन गार्इंचाही मृत्यू झाला आहे. गडावर सर्वत्र व पायवाटेवर असंख्य वृक्ष उन्मळून पडले आहेत.
वादळ थांबल्यानंतर स्थानिक नागरिक व बा रायगड परिवारच्या स्थानिक टीमने गडावर जाऊन पाहणी केली असता गडावरील परिस्थिती लक्षात आली.
गडावरील नुकसानीची माहिती वनविभागालाही देण्यात आली आहे. परिसरातील गाव व शेतीचे पंचनामे झाल्यानंतर प्रशासनाकडून गडावरील नुकसानीचे पंचनामे केले जाणार आहेत. बा रायगड परिवारच्या वतीनेही गडावरील संवर्धनाचे काम करण्यासाठी मदतीचे आवाहन करण्यात आले आहे. लवकरच मंदिर व वाड्यावर ताडपत्री टाकली जाणार आहे. भोराई देवी मंदिर व वाड्याची देखभाल ट्रस्टच्या वतीने केली जाते.
या दोन्ही वास्तूंच्या उभारणीसाठी ट्रस्टला सहकार्य केले जाणार आहे. इतर मंदिरांचे काम ग्रामस्थ व प्रशासनाला विश्वासात घेऊन शिवप्रेमी करणार आहेत.
वादळामुळे गडावरील मंदिरांचे छत उडाले आहे. एका मंदिरावर वृक्ष कोसळला आहे. वाड्याची भिंत कोसळली आहे. नुकसान खूप झाले आहे. भोराई ट्रस्ट, स्थानिक नागरिक व प्रशासनाला विश्वासात घेऊन पुन्हा नव्या जोमाने पुनर्बांधणीचे काम करण्यात येणार असून यासाठी सर्वांनी सहकार्य करावे.
- रूपेश शेळके, सदस्य, बा रायगड परिवार