सुधागडात युतीला आरपीआयची साथ !
By admin | Published: January 26, 2017 03:25 AM2017-01-26T03:25:28+5:302017-01-26T03:25:28+5:30
महाराष्ट्रासह रायगड जिल्ह्यात शिवसेना-भाजपा युतीबाबतीतील चर्चा व्हेंटिलेटरवर असताना याला सुधागड तालुका मात्र अपवाद
पाली : महाराष्ट्रासह रायगड जिल्ह्यात शिवसेना-भाजपा युतीबाबतीतील चर्चा व्हेंटिलेटरवर असताना याला सुधागड तालुका मात्र अपवाद ठरला असून सुधागडात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका शिवसेना व भारतीय जनता पार्टी युतीने लढणार अशी घोषणा शिवसेना जिल्हाप्रमुख प्रकाश देसाई यांनी काही दिवसांपूर्वीच केली होती. त्यांनी कामालाही सुरु वात केली. या युतीला आता तालुक्यात रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाची साथ मिळाल्याने सुधागडात शिवसेना-भाजपा व आरपीआय ही युती आता तालुक्यातील शेकाप-राष्ट्रवादी यांच्यात झालेल्या अभद्र आघाडीवर नक्कीच मात करेल असे जिल्हाप्रमुख प्रकाश देसाई यांनी ठामपणे सांगितले.
रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखाली केंद्रात व राज्यात युतीची सत्ता स्थापन करण्यासाठी आरपीआयचे मोठे योगदान व सिंहाचा वाटा आहे. याच पार्श्वभूमीवर आम्ही युतीबाबत सुधागड तालुका आरपीआय यांच्याशी चर्चा सुरु केली होती. त्या चर्चेला पूर्णविराम मिळून त्याला बुधवारी (२५ जानेवारी) मूर्त स्वरूप प्राप्त झाले. आता होणाऱ्या जिल्हापरिषद व पंचायत समिती निवडणुकीमध्ये तालुक्यात शिवसेना भाजप व आरपीआय अशी युती झाल्याची घोषणा जिल्हाप्रमुख देसाई यांनी केली. आम्ही एकसंघपणे सन्मान पूर्वक ही निवडणूक लढविणार असून उमेदवार कोण आहेत कोणत्या पक्षाचा आहे हे मुख्य नसून ते आमच्या युतीचे आहेत अशी खुणगाठ मनाशी बाळगून आम्ही सर्वजण काम करणार असा निश्चय युतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी केला. यावेळी आरपीआयच्या प्रचार प्रमुखपदी भगवान शिंदे यांची निवड केल्याची घोषणा आरपीआयचे तालुकाध्यक्ष राहुल सोनावले यांनी केली. या बैठकीला शिवसेना जिल्हाप्रमुख प्रकाश देसाई, भाजपा जिल्हा सरचिटणीस सुनील दांडेकर, शिवसेना उपजिल्हाप्रमुख व जि.प.उमेदवार राजेंद्र राऊत आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते. (वार्ताहर)