आज होणार साखर चौथच्या गणपतीचे आगमन, गणेश मंडळांची लगबग : जिल्ह्यात ६३० गणपतीच्या मूर्तींची होणार स्थापना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2017 03:24 AM2017-09-09T03:24:21+5:302017-09-09T03:24:32+5:30
शनिवारी ९ सप्टेंबर रोजी संकष्ट चतुर्थीला साखरचौथ गणपती बाप्पाचे आगमन होणार आहे. रायगड जिल्ह्यामध्ये सार्वजनिक २६८ आणि खासगी ३६२ अशा एकूण ६३० साखरचौथ गणपतीच्या मूर्तींची स्थापना होणार आहे.
अलिबाग : शनिवारी ९ सप्टेंबर रोजी संकष्ट चतुर्थीला साखरचौथ गणपती बाप्पाचे आगमन होणार आहे. रायगड जिल्ह्यामध्ये सार्वजनिक २६८ आणि खासगी ३६२ अशा एकूण ६३० साखरचौथ गणपतीच्या मूर्तींची स्थापना होणार आहे.
साखरचौथच्या आगमनाला काही तासच शिल्लक असल्याने विविध मंडळांची लगबग शुक्र वारी दिवसभर सुरू होती. शनिवारी सकाळी बाप्पाचे आगमन होणार आहे, तर रविवारी सायंकाळी विसर्जन करण्यात येणार आहे. या कालावधीमध्ये विविध कार्यक्र मांची रेलचेल राहणार आहे. बाप्पाला आरास करण्यासाठी मंडळांनी प्रचंड खर्च करून विविध देखावे साकारले आहेत. त्याचप्रमाणे आकर्षक सजावटीचे साहित्यही आणले आहे. मंडळांच्या कार्यकर्त्यांची तयारी अंतिम टप्प्यामध्ये आली आहे. वाजतगाजत बाप्पाच्या आगमनासाठी भक्त सज्ज झाले आहेत.
वर्षभर गणेशमूर्ती बनवणाºया मूर्तिकारांना मुख्य गणेशोत्सवात सहभागी होऊन गणेशोत्सव साजरा करता येत नाही. अशावेळी ते भाद्रपद वद्य संकष्ट चतुर्थीला गणेशमूर्तीची स्थापना करून साखरचौथ म्हणून गणेशोत्सव साजरा करतात. म्हणून याला मूर्तिकारांचा गणपती उत्सव म्हणूनही संबोधण्यात येतो. रायगड जिल्ह्यातील उत्तर विभागात साजरा करण्यात येणाºया साखरचौथ गणेशोत्सवाचे प्रस्थ अलीकडे रायगड जिल्ह्याच्या पश्चिम किनारपट्टीतही मोठ्या प्रमाणात वाढल्याचे दिसून येते. पनवेल, पेण, उरण तालुक्यांतील गावातून साखरचौथ गणेशोत्सवाची संख्या फार मोठ्या संख्येने आहे. साखरचौथ गणेशाची आराधना करूनच पुढील वर्षीच्या गणपती मूर्ती तयार करण्याच्या कामाला मूर्तिकार शुभारंभ करतात. साखरचौथच्या या उत्सवाला गौरा गणपती उत्सव, असेही म्हटले जाते.