- निखिल म्हात्रे अलिबाग - डोक्यावर तळपणारे ऊन, त्यामुळे घशाला वारंवार पडणारी कोरड. अशा अंगाची लाहीलाही करणार्या अवस्थेत थंडगार शुद्ध उसाचा रस मिळाला तर उन्हाने आलेला शीण कुठल्या कुठे पळून जातो. उन्हाच्या काहिलीने त्रस्त झालेल्यांना उसाचा गोड रस पाजून त्यांची तगमग कमी करणार्या उसाच्या रसाच्या चरख सध्या जत्रेमध्ये सर्वत्र दिसू लागले आहेत. अलिबाग तालुक्यातील वरसोली येथे भरलेल्या या जत्रेतून रोजगार मिळत असल्याचे चरख चालविणारे जितू वर्तक यांनी सांगितले आहे. मात्र या वर्षी मंदिची झळ हि आमच्या व्यवसायाला बसली असल्याचे वर्तक यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.
जत्रोस्तवाच्या काळावधीत हातावर हात धरून बसण्यापेक्षा दिड महिन्यांसाठी लागणारे सामानसुमान बांधायचे, रस काढायचे लाकडी गुर्हाळ सोबत घ्यायचे आणि टेम्पो भरून जिल्ह्यातील जत्र गाठायची हा त्यांचा दरवर्षीचा ठरलेला नेम.कुटुंबातल्या महिला व मुलेही या कामात बरोबरीने सहभागी होत आहेत. लोखंडी गुर्हाळापेक्षा लाकडी गुर्हाळात अधिक शुद्ध रसाची हमी असल्याचे जितू वर्तक आवर्जून सांगतात. अनेक वेळा लाकडी गुर्हाळात हात अडकण्याची भीती असते. काही जणांची बोटे निकामी झालीही आहेत, मात्र एवढा धोका तर पत्करावाच लागतो, असे सांगताना जीतू यांच्या डोळ्यांत काळजीची छटा चमकून जाते. रस काढण्यासाठी लागणारा ऊस ते पुणा येथून खरेदी करतात. सकाळी दहा ते रात्री बारा वाजेपर्यंत काम करायचे, तेव्हा कुठे त्यांना ते पाच दिवसात आपल्या कष्टाचे पैसे मिळतात.
जत्रा म्हटली कि सार काही एकाच ठिकाणी मिळून जात. पण याच जत्रेत मिळणारा ऊसाचा रस हा सर्वाांनाच हवाहवासा असतो. जत्रेतील ऊसाचा रस हा आरोग्यास पोषक असल्याने खास तो पिण्यासाठी यात्रेकरू येत असतात. अलिबाग येथील वरसोली येथे सुरु असलेल्या या विठोबाच्या जत्रेतून उसाचे चरख चाविणा-यांना पाच दिवसात यात्रेकरूंकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. जत्रेत 15 फक्त उसाच्या गु-हाळाची दुकाण आहेत. या शुध्द व नैसर्गिक ऊसाचा रस मिळत आहे. यावर्षी 20 रु फुल तर 15 हाफ तर 100 रुपये लिटरने रस विकला जात आहे. मागच्यावर्षी 7 हाजार 500 रुपये टनाने हा उस पोच होत असायचा. मात्र यावर्षी टनामागे 500 रुपये वाढल्याने 8 हाजार रुपये किंमतीने हा ऊस घ्यावा लागला आहे. जिल्ह्यात पार पडणा-या जत्रांपैकी, नागेश्वर-आवास, बोंबले विठोबा,वरसोली व थळ दत्त टेकडीवरील जत्रेत पारंपारीक पद्धतीचा माझा उसाचा चरख असून साधारणात: 10 जण कामगार या दिवसात आमच्याकडे काम करीत असल्याचे जितू वर्तक यांनी सांगितले.