सुगवेत एसटी थांबा गेला चोरीला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2018 11:10 PM2018-10-14T23:10:28+5:302018-10-14T23:10:57+5:30
कर्जत : कर्जत-मुरबाड राज्यमार्गावरील सुगवे गावाच्या बाहेर राज्य शासनाच्या निधीमधून प्रवासी निवारा केंद्र बांधण्यात आले होते. २० वर्षांपूर्वी बांधलेले ...
कर्जत : कर्जत-मुरबाड राज्यमार्गावरील सुगवे गावाच्या बाहेर राज्य शासनाच्या निधीमधून प्रवासी निवारा केंद्र बांधण्यात आले होते. २० वर्षांपूर्वी बांधलेले प्रवासी निवारा केंद्र गायब झाले असून, तेथे दुकानाचे गाळे बांधण्यात येत आहेत. या बाबत सार्वजनिक बांधकाम विभाग आणि एसटी महामंडळ अनभिज्ञ आहे.
सुगवे हे गाव पूर्वी खांडस परिसरातील गावकरी यांच्यासाठी महत्त्वाचा थांबा असलेले केंद्र होते. पूर्वी कशेळे अॅकॅडमी हा किकवी येथील रस्ता नसल्याने सर्व वाहने ही सुगवे येथूनच पुढे खांडस भागात जात असत, त्यामुळे शासनाने लोकांची सोय लक्षात घेऊन सुगवे गावाच्या बाजूला रस्त्यालगत एसटी निवारा केंद्र बांधले होते. त्या निवारा केंद्राचा फायदा प्रामुख्याने आदिवासी लोक आणि शालेय विद्यार्थी हे एसटी गाडीची वाट पाहण्यासाठी करीत असत.
मागील काही वर्षांपूर्वी किकवी बाजूने कशेळेकडे जाणारा रस्ता तयार केल्याने खांडस भागातून सुगवे येथे येणारा पत्र्याची वाडीकडील रस्त्याचा वापर कमी झाला, त्याचा फायदा काही लोकांनी घेतला आणि कर्जत-मुरबाड रस्त्याची ओळख असलेली प्रवासी निवारा शेड रात्रीच्या रात्री तेथून गायब झाली.
शासनाने निधी खर्च करून बांधलेल्या प्रवासी निवारा शेडच्या अचानक गायब होण्याच्या तक्रारी गावातील कार्यकर्त्यांनी केल्या होत्या. आता तर प्रवासी शेड गायब करणाऱ्या लोकांची हिंमत आणखी पुढे गेली आहे. त्यांनी प्रवासी शेडच्या जागेवर दुकानाचे गाळे बांधले आहेत. ते गाळे भाड्याने देऊन किंवा ते विकून बक्कळ पैसे कमावण्याचे कारस्थान असून, शासकीय यंत्रणा या बाबत मूग गिळून गप्प असल्याची शंका उपस्थित होत आहे. कारण स्थानिक कार्यकर्त्यांनी प्रवासी निवारा शेड गायब झाल्याबद्दल तक्रारी केल्या होत्या.
महसूल विभाग, एसटी महामंडळ आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने अद्याप चौकशीदेखील केली नाही, त्यामुळे चोरीला गेलेल्या प्रवासी निवारा शेडचे कोणालाही काहीही देणे-घेणे नाही, असे दिसून येत आहे. गावातील भूषण पेमारे यांनी चोरीला गेलेल्या एसटी निवारा शेडच्या जमिनीवर उभ्या राहत असलेल्या दुकानाच्या गाळ्यांना घरपट्टी लावू नये आणि असेसमेंट देऊ नये, असे लेखी पत्र ग्रामसभेत दिले आहे.
शुक्रवारी, १२ आॅक्टोबरची ग्रामसभा कोरम अभावी तहकूब झाली आहे, त्यामुळे सुगवे येथील चोरीला गेलेल्या एसटी निवारा शेडबद्दल ठोस कारवाई शासकीय यंत्रणेकडून होताना दिसत नाही.
शेडच्या जागी बांधले गाळे
उन्हाळ्यात ते प्रवासी शेड अचानक गायब झाल्याने स्थानिक रहिवासी अवाक झाले आहेत. या ठिकाणी गाळ्यांचे कामही सुरू करण्यात आले आहे. याबाबत दाद कोणाकडे मागायची? हा प्रश्न असल्याने रात्रीच्या रात्री चोरीला गेलेल्या प्रवासी शेडबाबत ग्रामस्थही गप्प आहेत, तर स्थानिक कार्यकर्त्यांनी याबाबत प्रशासनाकडे तक्रार केली आहे.