अलिबाग - परीक्षा संपल्या की, ठिकठिकाणी ‘समर कॅम्प’च्या जाहिरातींचे बोर्ड आपल्याला सर्रास दिसून येतात. उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये मुलांनी नेमके काय करावे आणि काय करू नये, यासाठी पालक जास्तीत जास्त काळजी करताना दिसतात. त्यांच्यातील हाच पॉइंट हेरून खासगी संस्थांनी समर कॅम्पचे फॅड आणले आहे. अलीकडे हाच ट्रेंड शहरांमध्ये चांगलाच स्थिरावत आहे; परंतु ‘गड्या आपुला गावच बरा’ असे म्हणणाऱ्या ग्रामीण भागातील मुलांसाठी समर कॅम्पच्याच धर्तीवर उन्हाळी शिबिर सध्या सुरु झाली आहे.
ग्रामीण भागातील मुलांनाही समर कॅम्प सारखा किंबहुना त्याहून अधिक आनंद सुट्टीत घेता येणार आहे. त्यामुळे यंदाची सुट्टी मुलांसाठी धम्माल मस्ती करणारी ठरणार आहे. शहरांमध्ये विविध संस्था समर कॅम्पचे आयोजन करत असतात. त्यामध्ये मुलांना स्वीमिंग, हॉर्स रायडिंग, डान्सिंग, सिंगिंग, अॅक्टिंग यासह अन्य अॅक्टिव्हिटी शिकवतात. त्यासाठी मुलांच्या पालकांकडून मोठ्या प्रमाणात फीही घेतली जाते. शहरामध्ये राहणाऱ्यांना अशा समर कॅम्पची फी परवडणारी असते. त्यामुळेच तर आपल्याला अशा समर कॅम्पमध्ये मुला-मुलींची प्रचंड गर्दी पाहायला मिळते. आठ दिवस ते १५ दिवसांसाठी असणाऱ्या समर कॅम्पमध्ये विविध त्या त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन दिले जाते, असा दावा त्या संबंधित संस्थेमार्फत केला जातो.
समर कॅम्पमध्ये चित्रकला, रांगोळी, मनोरंजनात्मक पारंपरिक खेळ (विटी दांडू, गोट्या, सूरपारंब्या, लगोरी) नाट्यीकरण, गोष्टी, गाणी, कथा, कविता, बडबड गीते गायन, मातीकाम यासह जमेल तसे इंग्रजी बोलणे, पारंपरिक वेशभूषा करणे, मैदानी खेळ, व्यक्तीमत्तव विकास घडविणारे बाबींचे ज्ञान, सामान्य ज्ञान, मुखवटे अशा साऱ्या गोष्टी शिकविल्या जातात.
समर कॅम्पच्या माध्यमातून आम्ही मुलांचे कला गुण पाहून त्या प्रमाणे त्यांना सुटटीचा आंनद कसा घेता येईल. या कडे विशेष लक्ष देत आहोत.- पुर्णता पाटील, शिक्षिका.
उन्हाचा पारा सकाळ पासूच चढत असल्याने मैदानी खेळ खेळता येत नाहीत, मात्र समर कॅम्प च्या माध्यमातून आम्ही अंतर्गत खेळ आम्ही खेळून सुट्टीचा आंनद घेत आहोत.- प्रसाद म्हात्रे, विद्यार्थी .
मैदानी खेळ उन्हामुळे खेळता येत नसल्याने मुले घरात त्रस्त होत होती, परंतु समर कॅम्प मुळे अगदी आंनदाने त्या ठिकाणी सर्व मुलांन सोबत वेळ घालवत आहेत. - ॲड. गीता म्हात्रे, पालक.