"सुनील तटकरे हे रोजच पक्ष बदलतात, मी मात्र लोकसभा लढविणार नाही"
By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2023 07:03 AM2023-09-28T07:03:24+5:302023-09-28T07:05:02+5:30
जयंत पाटील : शेकाप हा इंडिया आघाडीचा घटक पक्ष
लोकमत न्यूज नेटवर्क
अलिबाग : खासदार सुनील तटकरे हे रोज पक्ष बदलत असतात, अशी टीका शेकापचे आमदार जयंत पाटील यांनी केली. यावेळी ते म्हणाले, आमचा पक्ष हा इंडिया आघाडीत सहभागी असून, आगामी ग्रामपंचायत ते लोकसभा निवडणूक या आघाडीतून लढवणार आहे. शेकाप हा लोकसभेला इच्छुक नाही. जो उमेदवार इंडिया आघाडी देईल त्याचे काम आम्ही करणार आहोत, असे जयंत पाटील यांनी सांगितले.
यावेळी त्यांनी आमदार अपात्रतेबाबतही भाष्य केले. सुनावणीबाबत जाणूनबुजून उशीर केला जात आहे. सर्वोच्च न्यायालय गांभीर्याने हे प्रकरण घेईल. आठ दिवसांत याबाबत चित्र स्पष्ट होईल, असेही त्यांनी सांगितले. आरडीसीसी बँकेवर सहाव्यांदा चेअरमनपदी विराजमान झाल्यानंतर आमदार जयंत पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आगामी निवडणुकीत शेकापची भूमिका काय, आमदार अपात्रता सुनावणी आणि राजकीय परिस्थितीबाबत भाष्य केले. रायगडचे खासदार सुनील तटकरे यांच्या विजयात शेकापचा खारीचा वाटा आहे. मात्र, सध्या तटकरे हे अजित पवार गटात आहेत. याबाबत पाटील यांना प्रश्न विचारला असता, सुनील तटकरे हे रोज पक्ष बदलत आहेत, असे सांगत ते नेमके कोणत्या राष्ट्रवादीत आहेत, हेही कळत नाही. मात्र, पक्ष बदलीबाबत जनतेची तीव्र नाराजी आहे, असे पाटील यांनी सांगितले.
शेकाप हा इंडिया आघाडीमध्ये आहे. प्रागतिक पक्षाचा प्रमुख म्हणून मी इंडिया आघाडी बैठकीत होतो.
संविधान आणि लोकशाही वाचविण्यासाठी आम्हाला त्याग करावा लागला तरी चालेल.
इंडियाच्या माध्यमातून सर्व निवडणुका आम्ही एकत्रित लढवणार आहोत.
शेकाप हा लोकसभेसाठी इच्छुक नाही. जो उमेदवार आघाडी देईल त्याचे काम करणार आहोत, असे स्पष्टीकरण आमदार जयंत पाटील यांनी केले आहे.