घटकपक्षांच्या सहकार्यामुळेच विजय- सुनील तटकरे
By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2019 12:16 AM2019-05-24T00:16:25+5:302019-05-24T00:18:36+5:30
रायगड लोकसभा मतदारसंघातील सर्व मतदार आणि घटक पक्षातील सहकाऱ्यांच्या मदतीनेच निवडून येऊ शकलो,
- आविष्कार देसाई
अलिबाग : रायगड लोकसभा मतदारसंघातील सर्व मतदार आणि घटक पक्षातील सहकाऱ्यांच्या मदतीनेच निवडून येऊ शकलो, त्यामुळे २००४ मधील पराभवाचे उट्टे काढण्याची संधी मिळाल्याची प्रतिक्रिया विजयानंतर मुलाखत देताना रायगडचे नवनिर्वाचित खासदार सुनील तटकरे यांनी दिली आहे.
प्रश्न : तुमच्या विजयात कोणाचा वाटा आहे?
उत्तर : सुरुवातीच्या फेऱ्यांपासूनच चुरस निर्माण झाली होती; परंतु शेवटच्या १० फेºयांमध्ये मतांची आघाडी मिळत गेल्याने विजयाचे चित्र स्पष्ट झाले, माझ्या विजयामध्ये सर्वच विधानसभा मतदारसंघातील मतदारांचा वाटा आहे. मात्र, श्रीवर्धन मतदारसंघातील मतदारांनी मला भरभरून मते दिली त्यांचा उतराई होणे शक्य नाही, असे एका प्रश्नाच्या उत्तरात त्यांनी सांगितले.
प्रश्न : रायगडच्या विकासाबाबत काय सांगाल?
उत्तर : निवडणूक जाहीर झाल्यापासून गीतेंनी माझ्यावर खालच्या पातळीवर टीका केली; परंतु मी कधीच त्यांच्यावर व्यक्तिगत टीका केली नाही. आता माझा विजय झाला आहे, निवडणूक संपली आहे. आता रायगड लोकसभा मतदारसंघाच्या विकासावर लक्ष देणार आहे. विजयामुळे जबाबदारी वाढली त्याला न्याय देण्यासाठी जनसामान्यांसाठी काम करणार आहे.
प्रश्न : या विजयाबद्दल काय वाटते?
उत्तर : जिल्हा परिषद अध्यक्ष ते राज्याचा अर्थमंत्री या काळात केलेल्या लोकोपयोगी कामाची पावती या वेळी मतदारांनी मला दिली आहे.