Sunil Tatkare vs Anant Geete, Raigad: महाविकास आघाडी आणि महायुती असा संघर्ष सध्या महाराष्ट्राला नवीन नाही. गेल्या दीड-दोन वर्षात अनेक घडामोडी घडल्याने महाराष्ट्राचे राजकारण चांगलेच ढवळून निघाले आहे. तशातच आता लोकसभा निवडणूकही तिसऱ्या टप्प्यात पोहोचली असून सर्वच शिलेदार जोर लावताना दिसत आहे. ७ मे रोजी तिसऱ्या टप्प्यात होणाऱ्या मतदानामध्ये राज्यातील रायगडच्या मतदारसंघाचा समावेश आहे. यंदा रायगडमधून महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून ठाकरे गटाच्या अनंत गीते यांना संधी देण्यात आली आहे. तर महायुतीकडून अजितदादा गटाचे सुनील तटकरे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. रायगडात प्रचारसभांचा धडाका सुरु असतानाच आज सुनील तटकरेंनीअनंत गीतेंवर टीकेची तोफ डागली. पेण विधानसभा मतदारसंघात सुधागड तालुक्यातील परळी येथे महायुतीची जाहीर प्रचार सभा झाली.
अनंत गीते यांना रायगडमधून २००९ आणि २०१४ सालच्या लोकसभा निवडणुकीत विजय मिळाला होता. पण २०१९च्या निवडणुकीत मोदी लाट असूनही अंतर्गत कलहामुळे गीते यांच्या पराभव झाला होता. सुनील तटकरेंना तेथे विजय मिळाला होता. पण यंदा तटकरे आणि गीते यांच्यात कोण बाजी मारणार? याकडे साऱ्यांचेच लक्ष लागून राहिले आहे. अशा परिस्थितीत, तटकरेंनी अनंत गीते यांच्या मतदारयादीत नाव नसल्याच्या मुद्द्यावरून घणाघात केला. "रायगड लोकसभा मतदारसंघात असलेल्या गावात अनंत गीते यांचे मतदारयादीत नाव नाही. ज्या व्यक्तीचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, जे आपले मत गेली आठ टर्म फुकट घालवत आहेत; त्या व्यक्तीला लोकांच्या मतांची किंमत काय समजणार," असा सणसणीत टोला सुनिल तटकरे यांनी लगावला.
"सुधागड तालुक्यातील आजवरच्या सभा या रेकॉर्डब्रेक सभा झाल्या आहेत. जशी रेकॉर्डब्रेक गर्दी तुम्ही सर्व सभांना केली आहे, तसेच रेकॉर्ड ब्रेक मतदान करा आणि मला पुन्हा एकदा तुमची सेवा करण्याची संधी द्या. हे राष्ट्र नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सुरक्षित राहिले आहे, म्हणून आम्ही नरेंद्र मोदींच्या सरकारमध्ये सहभागी झालो. आमच्या लोकसभा निवडणुकीत जाहीरनाम्यामध्ये 'राष्ट्रासाठी राष्ट्रवादी' हा मंत्र देण्यात आला आहे. तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी जे बिल मांडले होते, ते बिल नंतर राहुल गांधी यांनी फाडून टाकले. त्यांची ही वृत्ती सर्वांनी पाहिली आहे. आज काँग्रेस मोदी सरकारवर संविधान बदलणार असल्याचा आरोप करत आहेत, पण तुम्ही जे वागलात ते लोक विसरणार नाहीत," असेही तटकरे म्हणाले.