रायगड: लोकसभा मतदारसंघाच्या अटीतटीच्या निवडणुकीत केंद्रीय मंत्री आणि शिवसेनेचे अनंत गीते यांचा राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस सुनील तटकरे यांनी ३१४३८ मतांनी पराभव केला. २०१४मधील आपल्या निसटत्या विजयाचा त्यांनी वचपा काढला आहे. तटकरे नामसाधर्म्याचे दोन उमेदवार मते खाण्याकरिता सेनेच्या माध्यमातून उभे केले होते. मात्र, त्याचा फायदा गीते यांना झाला नाही. दोन्ही उमेदवारांना १३०८५ मते मिळूनदेखील तटकरे ३१४३८ मताधिक्याने विजयी झाले.रत्नागिरीत चार वेळा आणि रायगडमध्ये दोन वेळा असे सहा वेळा अनंत गीते विजयी होऊन खासदार बनले होते. मात्र, २०१९ च्या निवडणुकीत मोदी लाटेतदेखील तटकरे यांनी आपले वेगळेपण शेतकरी कामगार पक्ष आणि काँग्रेसच्या सहयोगाने विजयी होत सिद्ध केले आहे. अलिबाग : रायगड लोकसभा मतदारसंघात रिंगणात जरी १६ उमेदवार होते तरी खरी लढत केंद्रीय मंत्री भाजप-शिवसेनेचे अनंत गीते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे यांच्यातच झाली. अंतिम निकालानुसार सुनील तटकरे यांनी ४ लाख ८६ हजार ९६८ मते मिळवून गीते यांचा तब्बल ३१ हजार ४३८ मतांनी पराभव केला. गीते यांना ४ लाख ५५ हजार ५३० मते मिळाली आहेत. सर्वाधिक मते मिळालेल्या सुनील दत्तात्रेय तटकरे यांना जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी विजयी घोषित केले. मतमोजणीच्या एकूण ३० फेऱ्या झाल्या.शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी शेकापचा संपूर्ण पाठिंबा देऊन तटकरे यांना विजयी करण्याचा बांधलेला चंग आणि त्याच वेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील नाराजीचे मुद्दे दूर करून मनोमिलन करण्यात सुनील तटकरे आणि जिल्हा काँग्रेस अध्यक्ष महाडचे माजी आमदार माणिक जगताप यांना आलेले यश हे तटकरे यांच्या विजयास कारणीभूत ठरू शकले आहे.भाजप-सेना सलोखा होऊन मतभेद दूर झाले आहेत. परिणामी, विजय नक्की, असा दावा शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी रायगडमधील प्रचारसभेत केला होता; परंतु फळास आला नाही. वंचित बहुजन आघाडीच्या सुमन कोळी यांना २३१९६ तर शिवसेनेकडून उभा करण्यात आलेला अपक्ष उमेदवार सुभाष पाटील यांना १२२६५ मते मिळाली. अलिबागचे स्थानिक आमदार पंडित पाटील यांच्या नावाशी साधर्म्य असणारे उमेदवार उभे केल्यावर ते शेकापची मते घेतील आणि तटकरेंची कमी होतील, अशी राजकीय क्लृप्ती त्यामागे होती.राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे यांच्याशी नामसाधर्म्य असणारे अपक्ष उमेदवार सुनील पी. तटकरे यांना ४१२६ तर सुनील एस. तटकरे यांना ९७५२ मते मिळाली आहेत. या दोघा उमेदवारांना एकूण १३७७८ मते मिळून देखील सुनील तटकरे विजयी झाले आहेत, हे वैशिष्ट्यपूर्ण मानले जात आहे. शिवसेना-भाजपच्या समन्वयात अभाव राहिल्याने अपयश आल्याची प्रतिक्रिया भाजप कार्यकर्त्यांनी दिली.>१९५२ मध्ये झालेल्या पहिल्या लोकसभा निवडणुकीत तत्कालीन कुलाबा लोकसभा मतदारसंघातून रोह्याचे सुपुत्र डॉ. सी. डी. देशमुख विजयी होऊन, भारताचे पहिले अर्थमंत्री झाले होते आणि २०१९ मध्ये पुन्हा एकदा रोह्याचेच सुपुत्र आणि जे राज्याचे अर्थमंत्री होते, असे सुनील तटकरे रायगडचे खासदार म्हणून विजयी झाले आहेत. याचा आनंद रोहेकर मतदार व्यक्त करीत आहेत. मुस्लीम मते आपल्याला मिळवण्याकरिता सेनेने रायगड माजी खासदार बॅ. ए. आर. अंतुले यांचे पुत्र नाविद अंतुले यांना शिवसेनेत प्रविष्ट करून घेऊन त्यांना गीतेंच्या प्रचाराकरिता फिरवण्यात आले. मात्र, मुस्लीम मतदारांनी ही राजकीय क्लृप्ती विचारात घेऊनच मतदान केले. परिणामी श्रीवर्धन या मुस्लीम बहुल विधानसभा मतदारसंघात तटकरे यांना विक्रमी मताधिक्य मिळाले.
केंद्रीय मंत्री अनंत गीते यांना पराभवाचा मोठा धक्का
By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2019 12:04 AM