लोकसभेसाठी पुन्हा तटकरे? कार्यकर्त्यांमध्ये उत्साह
By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2018 05:09 AM2018-10-06T05:09:59+5:302018-10-06T05:10:37+5:30
: आज पक्षाच्या बैठकीत होणार शिक्कामोर्तब
आविष्कार देसाई
अलिबाग : २०१९ साली होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसची महत्त्वाची बैठक शनिवारी पक्षाच्या मुंबई येथील कार्यालयात पार पडणार आहे. रायगडलोकसभा मतदार संघातून प्रदेश सरचिटणीस सुनील तटकरे यांच्या उमेदवारीवर अधिकृतरीत्या शिक्कामोर्तब या बैठकीत होणार आहे. शिवसेनेनेही खासदार अनंत गीते यांना उमेदवारी देण्याचे निश्चित केल्याने रायगडलोकसभा मतदार संघामध्ये पुन्हा दिग्गज नेत्यांची तुल्यबळ लढत रायगडकरांना अनुभवता येणार आहे.
मुंबईमधील बैठकीमध्ये प्रामुख्याने रायगड लोकसभा मतदारासंघाच्या व्यूहरचनेबाबतचा रोख राहणार आहे. २०१४ साली झालेल्या निवडणुकीमध्ये शिवसेनेचे खासदार गीते यांनी तटकरे यांचा अवघ्या दोन हजार ११० मतांनी पराभव केला होता. विशेष म्हणजे, तटकरे यांच्या पराभवाला विविध पैलू होते. त्यामध्ये प्रामुख्याने शेकापने तटकरे यांना निवडणुकीत पराभूत करायचेच, अशा सोंगट्या राजकीय पटलावर फेकल्या होत्या. शेकापने कोकणातील माजी आमदार रमेश कदम यांना तटकरे यांच्या विरोधात निवडणुकीत उतरवले होते. त्याचप्रमाणे सुनील तटकरे नामसार्धम्य असणारी व्यक्ती या निवडणुकीच्या रिंगणात शड्डू ठोकून उभी होती. शेकापने तटकरे यांच्या विरोधात पराकोटीचा प्रचार केला. त्यासाठी त्यांनी भाजपाचे आताचे खासदार किरीट सोमय्या, आम आदमी पार्टीचे प्रमख तथा दिल्लीचे विद्यमान मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या सारख्यांना हाताशी घेतले होते. तटकरे यांच्या विरोधात एकवटलेली साम, दाम, दंड, भेद यांची ताकद पराभवाला कारणीभूत ठरली. हे आव्हान स्वीकारून अनंत गीते यांना निवडणुकीत त्यांनी धोबीपछाड देण्याचा पुरेपूर प्रयत्न केला होता. गीते हे याआधी तब्बल एक लाख मताधिक्य घेऊन निवडून येत होते. मात्र, तटकरे यांनी गीतेंचा हाच सहा आकडी विजय अवघ्या दोन हजारांवर आणून ठेवण्याची किमया केली होती.
२०१९ साली होणाऱ्या निवडणुकीत तटकरे यांना विजय खेचून आणण्यासाठी शेकापची मदत लाखमोलाची ठरणार आहे. शेकापचे आमदार जयंत पाटील यांनी याआधीच विविध सभांमध्ये रायगड लोकसभेतून तटकरे यांना निवडून आणण्याच्या वल्गना केल्या आहेत. शेकापने अधिकृतरीत्या भूमिका स्पष्ट केली नसली, तरी त्यांची ताकदही तटकरे यांच्याच बाजूने राहणार असल्याचे दिसून येते.
लोकसभा निवडणुकीचे रणशिंग
शनिवारी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली होणाºया बैठकीमध्ये अधिकृतरीत्या तटकरे यांच्याच नावावर शिक्कामोर्तब होणार आहे, त्यामुळे मागील निवडणुकीतील पराभवाचा वचपा काढण्याची आयती संधी तटकरे यांना पक्षाकडून मिळणार असल्याने कार्यकर्ते, पदाधिकारी कमालीचे खूश झाले आहेत.दरम्यान, रायगड लोकसभेतून तटकरे यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केल्यास खºया अर्थाने पक्षाने लोकसभेच्या निवडणुकीचे रणशिंग रायगडमधून फुंकल्याचे अधोरेखित होते.