जिल्ह्याला 61 हजार 200 लसींचा पुरवठा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2021 01:07 AM2021-05-07T01:07:36+5:302021-05-07T01:08:04+5:30
१६ हजार कोवॅक्सिन तर ४५ हजार २०० कोविशिल्ड
लोकमत न्यूज नेटवर्क
रायगड : जिल्ह्यासाठी ६१ हजार २०० कोविशिल्ड, कोवॅक्सिन लसींचा साठा उपलब्ध झाला आहे. यामध्ये १६ हजार कोवॅक्सिन लस आहेत. यामधून १८ ते ४४ वर्षांपर्यंतच्या नागरिकांचे लसीकरण करण्यात येईल, तर ४५ हजार २०० कोविशिल्डच्या लसीमधून ४५ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण करण्यात येणार असल्याची माहिती, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी दिली.
अलिबाग येथील जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय माणगाव, रोहा, कर्जत, पेण, कर्जत व ग्रामीण रुग्णालय उरण, महाड या आठ रुग्णालयांमध्ये १८ ते ४४ वर्षांपर्यंतच्या नागरिकांचे कोरोना लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहे. जिल्ह्यासाठी १६ हजार कोवॅक्सिन लस उपलब्ध झाल्या आहेत. त्यांचे उपजिल्हा रुग्णालय माणगाव, रोहा, कर्जत व ग्रामीण रुग्णालय उरण, महाड या पाच रुग्णालयांमध्ये प्रती केंद्र ३ हजार २०० लसींचे वाटप करण्यात आले आहे, तर यापूर्वी जिल्ह्याला १८ ते ४४ वर्षांपर्यंतच्या नागरिकांच्या लासीकरणासाठी मिळालेल्या १० हजार कोविशिल्ड लसींचे अलिबाग येथील जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय पेण, पनवेल यांना वाटप करण्यात आले आहे. १४ ते ४४ वर्षांपर्यंतच्या नागरिकांनी ऑनलाईन पद्धतीने रजिस्ट्रेशन करून लस घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
७० टक्के लसी दुसऱ्या डोसकरिता राखीव
nजिल्ह्यात ४५ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण करण्यासाठी ४५ हजार २०० कोविशिल्ड लसी उपलब्ध झाल्या आहेत. यामधील ७० टक्के लसी या दुसरा डोस घेणाऱ्या नागरिकांसाठी आहेत. जिल्ह्याला मिळालेल्या ४५ हजार २०० कोविशिल्ड लसींपैकी ११ हजार ३०० लसी पनवेल महानगर पालिकेला देण्यात आल्या आहेत, तर जिल्ह्यातील जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालये व ग्रामीण रुग्णालयांना ११ हजार ३०० लसींचे वितरण करण्यात आले.
nतर उर्वरित २२ हजार ६०० लसींचे जिल्हाभरातील ५२ प्राथमिक आरोग्य केंद्र व त्यांच्या अखत्यारितील निवडक उपकेंद्र यामध्ये वाटप करण्यात आले आहे. ४५ वर्षांवरील काही नागरिकांनी कोवॅक्सिन लसीचा पहिला डोस घेतला आहे. त्यांना दुसऱ्या डोससाठी कोवॅक्सिन लसीची गरज आहे. त्यांच्यासाठी कोवॅक्सिन लसीची मागणी शासनाकडे करण्यात आली असून, लस उपलब्ध झाल्यानंतर त्यांना लसीचा दुसरा डोस देण्यात येणार आहे.