संजय गायकवाड ।लोकमत न्यूज नेटवर्ककर्जत : तालुक्यातील कळंब प्राथमिक आरोग्यकेंद्रातील रुग्णवाहिका मागील एक महिन्यापासून बंद असून त्याचा परिणाम येथील रुग्णसेवेवर होत आहे. त्याचप्रमाणे पुरेशा प्रमाणात औषधसाठा नसल्यामुळे रुग्णांना खासगी दुकानातून औषधे घ्यावी लागत असल्याने गोरगरीब रुग्णांची अडचण होत आहे. त्यामुळे आरोग्यकेंद्रात औषधसाठा तातडीने उपलब्ध करावा, तसेच रुग्णवाहिका सेवा सुरू करावी, अशी ग्रामस्थांमधून मागणी होत आहे.
बाह्यरुग्ण विभागात दररोज सरासरी १०० रुग्ण उपचारासाठी येतात. मात्र, मागणीप्रमाणे आरोग्यकेंद्र व उपकेंद्रात औषधपुरवठा होत नाही. शासकीय रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या रुग्णाला खासगी दुकानात औषधे घेण्यासाठी चिठ्ठी दिली जात आहे. कळंब आरोग्यकेंद्रांतर्गत पोशिर, मानिवली, बोरगाव, ओलमन आणि पाषाणे ही उपकेंद्र चालविली जातात.
सुमारे २३,०७७ लोकसंख्या असलेल्या या परिसरात बहुसंख्य भाग हा आदिवासी वस्तीचा असल्याने या दुर्गम डोंगराळ भागातील आजारी व्यक्तीस तसेच गरोदर महिलांना प्रसूतीसाठी कळंब आरोग्यकेंद्राशिवाय अन्य पर्याय नाही, त्याचप्रमाणे जंगल परिसरात वसलेल्या वाड्यावस्तींमधून सर्पदंश, विंचूदंशाचे रुग्ण उपचारासाठी येत असतात. या शिवाय साथीच्या आजाराचे प्रमाणही जास्त असल्याने या केंद्रात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या मोठी असते. मात्र, सध्या औषधांचा साठा मुबलक प्रमाणात नसल्याने काही वेळेस रुग्णांना बाहेरून विकतची औषधे आणावी लागत आहेत. यामुळे गोरगरिब रु ग्णांना याचा आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे.मागील महिनाभरापासून आरोग्य केंद्राच्या रुग्णवाहिके चा टायर खराब झाल्याने बंद अवस्थेत आहे. या संदर्भात संबंधित विभागास कळवले असून नवीन टायरची मागणी केली आहे. टायर उपलब्ध झाल्यास लवकरच रुग्णवाहिका सेवा सुरळीत होईल .- गणेश मानकामे, रुग्णवाहिकाचालक, प्राथमिक आरोग्यकेंद्र, कळंब
कळंब प्राथमिक आरोग्य- केंद्राकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष होत आहे. मागील महिन्याभरापासून येथील रुग्णवाहिका टायर नसल्याने बंद आहे. परिणामी, प्रसूतीसाठी येथे येणाºया महिलांना नेण्या-आणण्यासाठी खासगी वाहनाचा वापर करावा लागत आहे.- राहुल बदे, कळंब ग्रामस्थ