अलिबाग - महिलांना घरची लक्ष्मी म्हणून तिला घरात बसणे योग्य नाही, तिला लक्षी कमवणारी बनवावा. महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवले पाहिजे. आपल्या घरातील महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवण्यासाठी पाठिंबा दिला पाहिजे. महिला सर्वच क्षेत्रात चांगले काम करतायत, गरज आहे ती महिलांना समाजात व्यक्ती म्हणून समान स्थान देण्याची, असे मत रायगड जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी निर्मला कुचिक यांनी व्यक्त केले.
आंतरराष्ट्रीय महिलादिनाच्या पूर्वसंध्येला ( दि. ७ ) अलिबाग प्रेस असोसिएशन तर्फे आजोजित करण्यात आलेल्या तेजस्विनी पुरस्कार वितरण सोहळ्यात निर्मला कुचिक प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या. आदर्श भुवन येथे आयोजित करण्यात आलेल्या या समारंभास रायगड जिल्हा माहिती अधिकारी मनिषा पिंगळे, अलिबाग तहसिलदार विक्रम पाटील, आदर्श पतसंस्थेचे संस्थापक सुरेश पाटील, अलिबाग प्रेस असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाश सोनवडेकर उपस्थित होते.
ज्येष्ठ चित्रकार चंद्रकला कदम, जिवाची पर्वा न करता दोन अपहरणकर्त्यांना पकडणाऱ्या पोलीस हवालदार सुवर्णा खाड्ये, प्रतिकूल परिस्थितीवर मात कर एमपीएससी उत्तीर्ण होणाऱ्या सोनाली तेटगुरे तर धनुर्विद्या क्रीडा प्रकारात राष्ट्रीय पातळीवर पोहोचलेल्या तनिषा वर्तक यांना तेजस्विनी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
महिला या उत्तम व्यवस्थापक असतात. काहीवेळा आपले कर्तव्य बजावत असतान बरेचदा माहिला आपल स्वत्व हरवून बसतात. तसे नकरता महिलांनी वेगवेगळ्या पातळ्यांवर काम करून आपले स्वत्व जपावे, असे मत जिल्हा माहिती अधिकारी मनिषा पिंगळे यांनी व्यक्त केले.
महिला सर्वच क्षेत्रात चांगले काम करत आहे. त्यांना समाजाकडून केवळ प्रोत्साहनाची गरज असल्याचे तहसिलदार विक्रम पाटील म्हणाले.
रायगड जिल्ह्यातील तरुण मुलींनी स्पर्धा परिक्षासाठी तयारी करायला हवी. त्यातून भविष्यात प्रशासकीय अधिकारी महिला जिल्ह्याला मिळू शकतील असे मतं आदर्श पतसंस्थेचे अध्यक्ष सुरेश पाटील यांनी व्यक्त केले.
अलिबाग प्रेस असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाश सोनवडेकर यांनी प्रास्ताविक केले. सुत्रसंचलन महेश पोरे यांनी तर आभार प्रदर्शन संस्थेचे सचिव राजेश भोस्तेकर यांनी केले. यावेळी अलिबाग मधील विवीध क्षेत्रात काम करणारे मान्यवर मोठ्या संख्येनी उपस्थित होते.