माणगाव : राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे. हे सरकार धर्मनिरपेक्ष तत्त्वावर चालणारे सरकार आहे. राज्यात महिलांवर अत्याचार होऊ देणार नाही. तशी खंबीर पावले उचलत आहोत. पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी महिलांसाठी निवडणुकीमध्ये ५० टक्के आरक्षण आणून मोठी क्रांती केली आहे. सर्व स्तरांवर महिलांचे सक्षमीकरण झाले आहे. आज पुरुषांच्या बरोबरीने सर्व स्तरांतून महिला आघाडीवर आहेत. बचतगटाच्या माध्यमातून महिला स्वत:च्या पायावर उभ्या राहत असल्याचे प्रतिपादन खा. सुप्रिया सुळे यांनी केले.
माणगाव येथे शनिवारी महिला दिनानिमित्त आयोजित मेळाव्यात त्या बोलत होत्या. दिल्लीमध्ये गेले १० दिवस अधिवेशन सुरू आहे. परंतु गेले १० दिवस संसदेत कोणत्याही प्रकारचे कामकाज झाले नाही. दिल्लीत झालेल्या दंगलीचे उत्तर गृहमंत्री अमित शहांनी द्यावे, अशी मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे सातत्याने केली. मात्र अद्याप ते उत्तर देऊ शकले नसल्याची टीका खा. सुप्रिया सुळे यांनी केली.रायगड जिल्ह्यात बहुतेक सर्व पदांवर महिला काम करीत आहेत. पक्षाच्या माध्यमातून सर्वांनी अशाच प्रकारचे काम करणे गरजेचे आहे. आमदार, जिल्हाधिकारी, प्रांत, तहसीलदार, सभापती, नगराध्यक्ष, पोलीस उपनिरीक्षक या सर्व पदांवर महिला म्हणून उत्तमरीत्या काम करीत आहेत. खऱ्या अर्थाने रायगड जिल्ह्यात महिलाराज सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले.
राज्यामध्ये भाजपचे १०५ आमदार निवडून येऊनसुद्धा शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व इतर मित्रपक्ष मिळून महाविकास आघाडी बनवून राज्यात सत्ता आणण्याचे काम एकमेव शरद पवारच करू शकतात. त्यांनी आदिती तटकरे यांना ८ खात्यांची जबाबदारी देऊन महिला सक्षम आहेत, हे दाखवून दिले आहे.
राज्यमंत्री आदिती तटकरे म्हणाल्या, हळदीकुंकू कार्यक्रमापुरत्या मर्यादित न राहता संघटनावाढीचे काम महिला करीत आहेत. येथील महिला लोकप्रतिनिधी, महिला कार्यकर्त्या वेगवेगळ्या प्रकारचे चांगले उपक्रम राबवत आहेत. अर्थसंकल्पात एक हजार कोटींची तरतूद बचतगटातील वस्तू खरेदीसाठी केली आहे. या वेळी अर्थसंकल्पात कोकण विभाग पर्यटनास झुकते माप दिल्याचे तटकरे यांनी नमूद केले.कार्यक्रमाला माजी आ. सुरेश लाड, आ. अनिकेत तटकरे, जिल्हा अध्यक्षा गीता पालरेचा, राज्य महिला चिटणीस दिपिका चिपळूणकर, संगीता बक्क्म, सभापती अलका जाधव, नगराध्यक्षा योगीता चव्हाण, तालुका अध्यक्ष सुभाष केकाणे, तळा समाज कल्याण सभापती गीता जाधव, आदी मान्यवर उपस्थित होते.