कर्जत मतदारसंघातून सुरेश लाडच आघाडीचे उमेदवार, पत्रकार परिषदेत घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2019 02:52 AM2019-10-03T02:52:58+5:302019-10-03T02:53:10+5:30
आमदार सुरेश यांनी कार्यकर्त्यांची बैठक घेऊन निवडणुकीतून माघार घेतल्याने दोन दिवस सुधाकर घारे हे विधानसभा निवडणूक लढवतील, अशी उलटसुलट चर्चा सुरू होती; परंतु ही चर्चा चुकीची होती.
नेरळ : आमदार सुरेश यांनी कार्यकर्त्यांची बैठक घेऊन निवडणुकीतून माघार घेतल्याने दोन दिवस सुधाकर घारे हे विधानसभा निवडणूक लढवतील, अशी उलटसुलट चर्चा सुरू होती; परंतु ही चर्चा चुकीची होती. आमदार सुरेश लाड यांनी जिल्हा परिषद सदस्य सुधाकर यांना विधानसभा निवडणूक लढवावी अशी विनंती केली होती; परंतु विधानसभा ही आमदार सुरेश लाड यांनीच लढवावी, अशी सर्व कार्यकत्यांची इच्छा आहे. आघाडीचे उमेदवार सुरेश लाडच असतील, अशी घोषणा सुधाकर घारे यांनी आघाडीच्या पत्रकार परिषदेत केली.
कर्जत मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शेतकरी कामगार पक्ष, एसआरपी व अन्य समविचारी पक्ष महाघाडीच्या उमेदवारी संदर्भात पूर्ण घोषणा करण्यासाठी राष्ट्रवादी भवन येथे बुधवारी सायंकाळी ५ वाजता पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी आघाडीचे उमेदवार आमदार सुरेश लाडच असतील, अशी घोषणा पत्रकार परिषदेत आघाडीच्या नेत्यांनी केली आहे. या वेळी शेकापचे तालुका चिटणीस प्रवीण पाटील यांनीदेखील शेतकरी कामगार पक्ष आमदार सुरेश लाड यांना पाठिंबा दिल्याचे जाहीर केले. आमदार सुरेश लाड यांनीच ही निवडणूक लढवलीच पाहिजे असे सांगतले. तसेच काँग्रेसचे मुकेश सुर्वे तसेच आघाडीच्या सर्वच नेत्यांनी लाड यांना पाठिंबा दिला.
या वेळी शिवसेनेतून राष्ट्रवादीत प्रवेश केलेल्या हनुमंत पिंगळे यांनी शिवसेनेच्या उमेदवारांवर टीका करत त्या उमेदवाराला घरी बसविल्याशिवाय गप्प बसणार नसल्याचे सांगितले. आमदार सुरेश लाड हे आघाडीचे उमेदवार असल्याचे संकेत असताना चार दिवसांपूर्वी आमदार सुरेश लाड हे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या बातम्या आणि चर्चा सोशल मीडियावर होत होती; परंतु सोमवारी शिवसेनेने महेंद्र थोरवे यांना एबी फॉर्म दिल्याने थोरवे यांची उमेदवारी नक्की झाली. त्यामुळे सुरेश लाड यांच्या पक्षप्रवेश अफवांवर अखेर पडदा पडला. त्यानंतर सोमवारी सायंकाळी लाड यांनी राष्ट्रवादीच्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक घेऊन मी निवडणूक लढवत नसल्याचे जाहीर केले होते.
त्यानंतर राष्ट्रवादी कार्यकर्त्यांमध्ये कमालीची अस्वस्थता पसरली होती. दोन दिवसात अनेक घडामोडी घडल्याने मोठा बदल घडून आला आहे. शिवसेनेचे २०१४ साली निवडणूक लढविलेले हनुमंत
पिंगळे यांनी खासदार तटकरे आणि
आमदार सुरेश लाड यांच्या उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात
जाहीर प्रवेश केला त्यानंतर राजकीय गणिते बदल्यांस सुरुवात झाली.
या पत्रकार परिषदेस आमदार सुरेश लाड, हनुमंत पिंगळे, जिल्हा परिषद सदस्य सुधाकर घारे, समाज कल्याण सभापती नारायण डामसे, शिक्षण सभापती नरेश पाटील, राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष अशोक भोपतराव, तानाजी चव्हाण, शेकापचे तालुका चिटणीस प्रवीण पाटील आदी उपस्थित होते.
चार वेळा उमेदवारी मिळाली असून तीन वेळा आमदार झालो आहे. त्यात मी समाधानी आहे; परंतु आजची निवडणूक ही खर्चिक झाली असल्याने मी ही निवडणूक लढवत नसल्याचे सांगितले होते. तसेच पक्षश्रेष्ठीकडेही तसे कळविले होते. दुसरा उमेदवार निवडा असेदेखील सांगितले होते; परंतु दोन दिवस कार्यकर्त्यांची विनंती आणि कर्जत-खालापूर तालुक्यात शांतता राहावी यासाठी तुम्हीच उमेदवारी घ्यावी, अशी विनंती केल्याने ही उमेदवारी स्वीकारत आहे.
- सुरेश लाड, आमदार