सुरेश लाड यांचा पुन्हा उपोषणाचा इशारा
By admin | Published: March 31, 2017 06:21 AM2017-03-31T06:21:42+5:302017-03-31T06:21:42+5:30
तालुक्यातील निकोप, कडाव, मार्केवाडी, वडवली, भातगाव, वावळोली, बेंडसे, कोषाणे, सावरगाव आदी गावांच्या
कर्जत : तालुक्यातील निकोप, कडाव, मार्केवाडी, वडवली, भातगाव, वावळोली, बेंडसे, कोषाणे, सावरगाव आदी गावांच्या शेतजमिनीमधून रिलायन्स गॅस पाइप लाइन जात आहे, तशा प्रकारच्या नोटीस भूसंपादन विभागाकडून संबंधित शेतकऱ्यांना यापूर्वीच आल्या आहेत. मात्र, काही झाले तरी आम्ही आमच्या शेत जमिनीतून पाइप लाइन टाकू देणार नाही, असा ठाम निर्धार कर्जतमधील शेतकऱ्यांनी याआधीच केला आहे, याबाबत अनेक वेळा शेतकऱ्यांनी विरोध दर्शविला आहे. त्यानंतर आमदार सुरेश लाड व सहकारी पक्षाचे पदाधिकारी आणि शेतकरी नोव्हेंबर २०१६ रोजी उपोषणाला बसले होते. मुख्यमंत्र्याच्या मध्यस्थीने उपोषण मागे घेण्यात आले होते. चार महिन्यांत काहीच प्रगती नाही. अखेर १० एप्रिल रोजी आमदार सुरेश लाड यांनी पुन्हा उपोषणाचा इशारा दिला. या इशाऱ्यावर गुरुवारी रिलायन्सचे अधिकारी कर्जतमध्ये येऊन पुन्हा चर्चा करू लागले. मात्र, ही चर्चा पाहिजे तशी सकारात्मक झाली नाही.
दहिवली येथील सन्मित्र सभागृहात बाधित शेतकऱ्यांशी चर्चा करण्यासाठी बैठक बोलाविण्यात आली होती. या वेळी माजगाव आंबिवली येथील शेतकरी वसंत शिवराम कांबळे यांना नोटीस न देता रिलायन्स त्यांच्या शेतातून पाइप लाइन टाकत आहे, असे बैठकीत सांगितले. या वेळी उपविभागीय अधिकारी दत्ता भडकवाड, शेकापचे विलास थोरवे, कम्युनिस्ट पक्षाचे नेते गोपाळ शेळके, काँग्रेसचे दिनानाथ देशमुख आदींसह शेतकरी उपस्थित होते. (वार्ताहर)