पालीतील आयटीआय समस्यांच्या भोवऱ्यात; सहा वर्षांत इमारतीची दयनीय अवस्था
By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2019 12:01 AM2019-12-11T00:01:54+5:302019-12-11T00:02:10+5:30
पालीतील शिळोशी मार्गावरील आयटीआय कॉलेजचे उद्घाटन २७ जानेवारी २०१४ रोजी झाले
- विनोद भोईर
पाली : पालीतील शिळोशी मार्गावरील आयटीआय कॉलेजचे उद्घाटन २७ जानेवारी २०१४ रोजी झाले. अवघ्या सहा वर्षांत इमारतीची दयनीय अवस्था झाली आहे, त्या वेळी इमारतीवर शेड बसविण्यात आले असते तर ही परिस्थिती निर्माण झाली नसती. पावसाच्या पाण्याने वर्गातील वस्तूंचे नुकसान झाले आहे. वीजतंत्री वर्गात वीज विद्युत ट्रान्सफरची मुख्य लाइन खुली असल्याने धोका निर्माण होऊ शकतो. वारंवार पाली विद्युत कार्यालयात अर्ज करूनही याकडे दुर्लक्ष केले जात आहे. तसेच सार्वजनिक बांधकाम खात्याने आयटीआय कॉलेजच्या इमारतीची पाहणी करून चार महिने झाले तरी त्याची दुरुस्ती केली नाही.
गेल्या सहा वर्षांपूर्वी आयटीआय कॉलेजचे उद्घाटन झाले, ही इमारत व तिचा परिसर दोन हेक्टर इतका आहे. त्यात अभिलेख कक्ष, वीजतंत्री वर्ग, मल्टीमीडिया अॅनिमेशन, भंडारा खोली, वर्गखोली, दोन कात्रण व शिवण वर्गखोली, तारतंत्री वर्कशॉप, तारतंत्री वर्गखोली, ग्रंथालय, मोठा वर्कशॉप, असा परिसर आहे. त्यातील मुलींची टेलरिंग व कटिंग वर्ग प्रवेश नसल्याने बंद आहे. सध्या कॉलेजमध्ये ४२ विद्यार्थी शिकत आहेत. २१ वायरमेन व २१ फिटर आहेत. बॅच वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, असे प्राचार्य यांनी सांगितले.
शासनाने मुला-मुलींना चांगल्या दर्जाचे शिक्षण देऊन उत्तम डिग्री घेऊन व्यवसाय व नोकरी करावी, यावर मोठ्या प्रमाणात शासन खर्च करत आहे; परंतु ग्रामीण भागातील कॉलेजकडे पूर्णत: दुर्लक्ष होत आहे. यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी अडचणींची दखल घेऊन विद्यार्थ्यांना उत्तम शिक्षण घेता येईल यासाठी उपाययोजना करावी, अशी मागणी पालकांकडून होत आहे.
आयटीआय कॉलेज इमारतीची पाहणी केली आहे, त्याची दुरुस्ती व शेडचे अंदाजपत्रक बनवून सार्वजनिक बांधकाम विभाग अलिबाग यांच्याकडे या दोन दिवसांत पाठविणार आहे.
- दिलीप मदने, उपअभियंता