खालापूर तालुक्यात पाणथळ जागांचे सर्वेक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2019 11:56 PM2019-06-03T23:56:58+5:302019-06-03T23:57:03+5:30
जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश : तालुकानिहाय समिती स्थापन; कर्जत तालुक्यात दहा पाणथळ जागा
खोपोली : मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मुंबई, ठाणे, पालघर, रायगड व रत्नागिरी या जिल्ह्यांतील पाणथळ जागांचे (वेट लॅण्ड) सर्वेक्षण सुरू आहे. या अंतर्गत जिल्हाधिकारी रायगड यांनी तालुकानिहाय समिती स्थापन करून सर्वेक्षणाचे आदेश दिले. त्यानुसार कर्जत व खालापूर तालुक्यात सर्वेक्षणाचे काम सुरू करण्यात आले आहे.
खालापूरचे तहसीलदार ईरेश चप्पलवार व कर्जतचे तहसीलदार अविनाश कोष्टी यांच्या अध्यक्षतेखाली या दोन तालुक्यांसाठी स्थापन करण्यात आलेल्या दोन स्वतंत्र समितींमध्ये डॉ. अपर्णा फडके, निखिल गवई, कपील अष्टेकर, डॉ. स्मिता गीध, प्रदीप कुळकर्णी, नंदकुमार तांडेल, अभिजित घरत व वैभव पटवर्धन यांचा समावेश आहे. या समितीत दोन्ही तालुक्यांचे नायब तहसीलदार, वन क्षेत्रपाल, तालुका कृषी अधिकारी यांचा पदसिद्ध सदस्य म्हणून समावेश करण्यात आला आहे. खालापूर तालुक्यात १२ व कर्जत तालुक्यात दहा पाणथळ जागांचे सर्वेक्षण करण्यासाठी डॉ. अपर्णा फडके व त्यांच्यासह अन्य अशासकीय सदस्यांनी दोन्ही तालुक्यातील तहसीलदारांसोबत शासकीय सदस्य व तलाठी यांच्यासोबत बैठका घेतल्या. या वेळी दोन्ही तहसीलदारांनी संबंधित शासकीय अधिकारी व तलाठी यांना आवश्यक ती माहिती व कागदपत्रे उपलब्ध करून योग्य ते सहकार्य करण्याचे आदेश दिले.
खालापूर तालुक्यात आत्करगाव, सांगडे, करंबेळी, उसरोली, कुंभिवली, तांबाटी, नढाळ, लोधिवली, कलोते, मोकाशी, वडविहीर व भिलवले येथील पाणस्थळांचा समावेश आहे तर कर्जत तालुक्यात खांडपे, पाथरज, जामरुंग, बलिबरे, पाषाणे, पळसदरी, साळोख, कोदिवले, अवसुले व डिकसळ या गावातील पाणस्थळांचा अंतर्भाव आहे. डॉ. अपर्णा फडके या मुंबई विद्यापीठात भूगोलतज्ज्ञ आहेत.
इराणमधील रामसर येथे २ फेब्रुवारी १९७१ रोजी जागतिक पाणथळ जागा समितीची स्थापना करण्यात आली. तेव्हापासून २ फेब्रुवारी हा दिवस जागतिक पाणथळ जागा दिन म्हणून साजरा करण्यात येतो, अशी माहिती डॉ. अपर्णा फडके यांनी दिली.
जैव विविधतेने नटलेल्या, परिपूर्ण अशा भारतातील २७ जागांचा जागतिक पातळीवर रामसर पाणथळ जागांमध्ये समावेश करण्यात आला आहे, असेही त्या म्हणाल्या.
मानवाच्या अनिर्बंध हस्तक्षेपामुळे निसर्गाचा ºहास होऊन संकट ओढावले - फडके
सर्वेक्षणाबाबत अधिक माहिती देताना डॉ. अपर्णा फडके यांनी मानवाच्या अनिर्बंध हस्तक्षेपामुळे ढासळलेला नैसर्गिक समतोल, जागतिक तापमान वाढ, त्सुनामी यामुळे अवर्षण व अतिवर्षण अशा समस्या निर्माण होत असून मानवजात संकटात आली आहे, असे सांगितले.
नैसर्गिक समतोल राखण्यात पाणथळ जागांची मोठी भूमिका आहे, असे स्पष्ट करून किनारपट्टीलगतच्या पाणथळ जागांमध्ये भरतीच्या लाटांची तीव्रता कमी करण्याची क्षमता असते. या जागा नैसर्गिक अन्न साखळीतील असंख्य जीवांचे आश्रयस्थान असतात.
सूक्ष्म जीवांपासून प्राणी, पक्षी, वनस्पती यांचे जीवन त्यावर अवलंबून असते. पाण्यातील दूषित घटक शोषून जलशुद्धीकरणाचे कार्य या जागा नैसर्गिक रीतीने करीत असतात. यासाठी पाणथळ जागांचे संरक्षण व संवर्धन करण्याची गरज असल्याचे फडके यांनी सांगितले.