ओलमणमधील जलयुक्तची पाहणी
By Admin | Published: December 27, 2016 02:37 AM2016-12-27T02:37:35+5:302016-12-27T02:37:35+5:30
रायगड जिल्ह्यात जलसंधारणाची कामे पाहायला जिल्ह्याबाहेरची टीम येणे हे तसे दुरापास्त. परंतु कर्जत तालुक्यात जलयुक्त शिवारच्या माध्यमातून ओलमणसारख्या डोंगराळ
कर्जत : रायगड जिल्ह्यात जलसंधारणाची कामे पाहायला जिल्ह्याबाहेरची टीम येणे हे तसे दुरापास्त. परंतु कर्जत तालुक्यात जलयुक्त शिवारच्या माध्यमातून ओलमणसारख्या डोंगराळ भागात साठविलेले पाणी हे तसे आश्चर्य समजले जात आहे. त्या भागातील जलयुक्त शिवारच्या माध्यमातून साठविलेले पाणी आणि माहिती घेण्यासाठी हिमाचल प्रदेशमधील तज्ज्ञ वरिष्ठ अधिकाऱ्यांनी येथेपाहणीकेली. जलयुक्त शिवार अभियान जिल्ह्याबाहेर नाही तर राज्याबाहेर पोहचले आहे. पाणी मुबलक असलेल्या हिमाचल प्रदेशातही राज्य जलसंधारण कार्यक्र म राबविण्यास सुरु वात करणार आहे. त्यासाठी त्यांच्या टीमने राज्यात केवळ कर्जत तालुक्यातील ओलमण गावातील कामांची पाहणी केली.
कर्जत तालुक्याचे शेवटचे टोक असलेल्या ओलमण गावात २०१५ पासून जलयुक्त शिवार अभियान राबविले जात आहे. तेथे मोठ्या प्रमाणात कृषी विभाग आणि वन विभागाने जलसंधारणची कामे जलयुक्त शिवार अभियानात केली आहेत. त्यात मातीचे बांध, सिमेंट नाला बांध आणि सिमेंट बंधारे बांधण्यात आले. वन विभागाने २०० हेक्टर जंगल भागात वन खंदक खोदून पावसाचे पाणी जमिनीत जिरविण्याचा प्रयत्न केला आहे. त्या सर्वांचा परिणाम ओलमणसारख्या डोंगरात वसलेल्या गावातील जमिनीची भूजल क्षमता वाढली आहे. त्याबद्दल जलयुक्त शिवार अभियानाला धन्यवाद देत आहेत. गावाच्या शिवारात अजूनही दोन सिमेंट नाला बांध यांची कामे अपूर्ण आहेत, परंतु चांगले काम पावसाळ्यापूर्वी झालेल्या नेहमी पाणीटंचाईच्या झळा सोसत असलेल्या आदिवासी लोकांची वस्ती असलेल्या गावातील जलसंधारणाची कामे पाहण्यासाठी शेजारच्या गावातील, तालुक्यातील, जिल्ह्यातील, शेजारच्या जिल्ह्यातील नाहीतर परराज्यातील तज्ज्ञांची टीम ओलमण येथे पोहचली आहे.
डोंगर रांगात वसलेल्या ओलमणमध्ये पाटबंधारे विभागाने बांधलेला सिमेंट बंधारा आणि कृषी विभागाच्या माध्यमातून बांधलेले सिमेंट नाला बांध यांची यशोगाथा आता देशात पोहचली आहे. हिमाचल प्रदेशात मोठ्या प्रमाणात असलेल्या डोंगराळ भागात तेथील राज्य सरकारकडून जलसंधारणाची कामे केली जाणार आहेत. तेथील जमिनीत पावसाचे पाणी जिरविण्याची पद्धत जाणून घेण्यासाठी भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी, हिमाचल प्रदेशच्या नियोजन समितीचे प्रमुख असलेले अवतार सिंग यांच्या नेतृत्वाखाली पथकाने राज्यातील ओलमण या एकमेव गावाला भेट दिली. त्या पथकात भारतीय फॉरेस्ट सेवेतील अधिकारी अनिल कुमार यांच्यासह पाच वरिष्ठ अधिकारी देखील होते. हे पथक ओलमणनंतर पुढे राज्याचे कृषी आयुक्त यांच्याशी चर्चा केल्यानंतर गोवा राज्यात पोहचले. हिमाचल प्रदेश राज्यातील नियोजन समितीच्या पथकाला उप विभागीय कृषी अधिकारी पी. डी. शिगेदार, तालुका कृषी अधिकारी अंकुश टकले, मंडळ कृषी अधिकारी वैभव विश्वे आदींनी त्या पथकाला सर्व माहिती दिली. (वार्ताहर)