लाटांनी ओलांडला संरक्षण बंधारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2018 02:27 AM2018-07-15T02:27:58+5:302018-07-15T02:28:01+5:30
१२ ते १७ जुलै असे सहा दिवस समुद्रास मोठे उधाण येऊन ४.९६ मीटर उंचीच्या लाटा समुद्रात उसळतील, असा भारतीय हवामान विभागाने इशारा दिला होता.
अलिबाग : १२ ते १७ जुलै असे सहा दिवस समुद्रास मोठे उधाण येऊन ४.९६ मीटर उंचीच्या लाटा समुद्रात उसळतील, असा भारतीय हवामान विभागाने इशारा दिला होता. शनिवारी रायगड जिल्ह्याच्या किनारीभागात उधाण भरती आली. मोठ्या लाटांमुळे अलिबागमधील समुद्र संरक्षक बंधारा ओलांडून पाणी जेएसएम कॉलेजच्या मैदानापर्यंत आले होते.
पर्यटक आणि अलिबाग शहरवासीयांनी मोठ्या लाटांचा थरार अनुभवण्याकरिता समुद्रकिनारी गर्दी केली होती. दरम्यान, अलिबाग तालुक्यातील रेवस, बोडणी आणि खारेपाटातील शहापूर, धेरंड गावांच्या हद्दीतदेखील समुद्र व खाडीचे पाणी शिरले होते; परंतु कोठेही अनुचित प्रकाराची नोंद नाही.
अलिबाग समुद्रकिनारी कुलाबा किल्ल्यासमोर पाण्याचा रंग गढूळ झाल्याचे दिसून आले. त्याचबरोबर लाटांचा वेगही जास्त होता. पर्यटकांनी समुद्रात जाऊ नये, अशा सूचना देण्यासाठी अलिबाग नगरपरिषदेचे जीवरक्षक समुद्रकिनारी कार्यरत होते. शुक्रवारी रात्री जाणवलेल्या भूकंपाच्या धक्क्यांचा समुद्राच्या मोठ्या लाटांशी कोणताही संबंध नसल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सागर पाठक यांनी दिली.
आगामी तीन दिवस म्हणजे १५ ते १७ जुलैपर्यंत समुद्रात ४.९७ मीटर उंचीच्या लाटा येण्याचा इशार भारतीय हवामान विभागाने पूर्वीच दिला असल्याने जिल्ह्यातील किनारी भागात सतर्कतेचा इशारा देण्यात आल्याचे पाठक यांनी सांगितले.
>मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये
रायगड पोलीस दलाच्या माध्यमातून जिल्ह्यातील किनारी भागातील सर्व गावांमध्ये कार्यरत सागर रक्षक दलाच्या सदस्यांनाही समुद्रभरतीच्या वेळी सतर्क राहण्याकरिता सूचित करण्यात आले आहे.
समुद्र खवळलेल्या असल्याने कोळी बांधवांनी मच्छीमारीकरिता समुद्रात जाऊ नये, असा इशारा मत्स्य विभागाच्या माध्यमातून देण्यात आला आहे.
>पावसाच्या उघडीपमुळे उधाण आले नाही
रेवदंडा : किनारपट्टीवर उधाणाचा फटका स्थानिकांना बसू शकतो, अशी स्थिती असताना रेवदंडा, थेंराडा किनारपट्टीवर कुठेही उधाणाने पाण्याची पातळी वाढली किंवा पाणी घरात शिरणे, शेतीचे बांध फुटले, असा प्रकार झाला नाही. उधाणाचे पाणी आले नाही त्याचे कारण पावसाने पूर्णपणे घेतलेली उघडीप हे आहे, असे मत जाणकार नागरिक थेंरोडा-आगल्याचीवाडीमधील हेमंत खंडेराव यांनी सांगितले.
>उधाणामुळे पाण्याची पातळी वाढली
कार्लेखिंड : आलिबाग तालुक्याला जवळ जवळ ५० किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभला आहे. किनाऱ्यालगत गावांचा मासेमारी हा प्रमुख व्यवसाय आहे. सध्या उधाणाचा इशारा दिल्याने किनारी भागांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. रेवस, मांडवा, बोडणी, सासवणे हा किनारा वळणाचा असल्यामुळे शनिवारी या ठिकाणी पाण्याला जोर असतो. उधाणाच्या भरतीने रेवस, बोडणी दरम्यान सारळ पूल या रस्त्यावरून पाणी गेले.
उधाणाची भरती ही या वर्षातील सर्वात मोठी भरती होती. ४.९७ मीटर एवढे पाणी वाढले होते, अशी माहिती येथील मच्छीमारी व्यवसाय करणारे रूपेश नाखवा यांनी दिली. मच्छीमारी बंद असल्यामुळे कोणही कोळी बांधव समुद्रामध्ये गेलेले नाहीत, अशी माहिती मच्छीमार सोसायटी, बोडणीचे चेअरमन विश्वास नाखवा यांनी दिली. तसेच किनाºयावरील माणकुले गावात नेहमी पाणी शिरते; परंतु रस्त्याच्या बांधकाम आणि भरावामुळे गावात पाणी शिरले नाही. सरकारी सूचना तसेच माहितीमुळे जीवितहानी झालेली नाही.