जीवरक्षकांनी वाचवले सात जणांचे प्राण, गौरी-गणपतीचे विसर्जन करण्यासाठी गेले होते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2017 02:23 AM2017-09-02T02:23:27+5:302017-09-02T02:24:03+5:30
श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगर येथील कोळीवाडा भागाच्या समुद्रकिनारी बोर्ली पंचतन येथील गौरी-गणपतीचे विसर्जन करण्यासाठी गेलेले बोर्ली पंचतन येथील सात तरुण समुद्राच्या पाण्याचा अंदाज न आल्याने बुडत असल्याचे किनारी
बोर्ली पंचतन : श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगर येथील कोळीवाडा भागाच्या समुद्रकिनारी बोर्ली पंचतन येथील गौरी-गणपतीचे विसर्जन करण्यासाठी गेलेले बोर्ली पंचतन येथील सात तरुण समुद्राच्या पाण्याचा अंदाज न आल्याने बुडत असल्याचे किनारी उभ्या असलेल्या दिघी सागरी पोलीस ठाण्याच्या कर्मचाºयांना समजले. त्यांनी तत्काळ समुद्रकिनाºयावर हजर असलेल्या जीवरक्षक प्रीतम भुसाणे व सागरी रक्षक लाया चोगले, मनोहर रघुवीर यांना सांगितले. त्यावर या तिघांनीही कोणताही विचार न करता बुडत असलेल्या सात जणांना सुखरूप बाहेर काढले. जीवरक्षक प्रीतम भुसाणे व सागरी रक्षक लाया चोगले, मनोहर रघुवीर या तिघांचेही सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.
बोर्ली पंचतन येथील गणपती विसर्जन हे काही वर्षांपासून दिवेअगार कोळीवाडा भागातील समुद्रकिनारी करण्यात येते. दीड दिवसाच्या गणपतींचे विसर्जन सुरक्षित पार पडल्यानंतर गुरुवारी गौरी-गणपतींचे विसर्जन करण्यासाठी सायंकाळी ५ नंतर बोर्ली पंचतन येथून जवळपास ५०० गणेशमूर्ती दिवेआगर समुद्रकिनारी पोहचल्या. मागील काही दिवस पावसाने कहर केल्याने समुद्रामध्ये वादळाचे वातावरण होते. गणेश विसर्जनाच्या वेळी देखील समुद्र थोडा खवळलेल्या स्थितीमध्ये होता. येथील स्थानिक मच्छीमारांच्या अंदाजानुसार समुद्र शांत झालेला नसल्याचे सांगण्यात आले. विसर्जनस्थळी दिघी सागरी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक धर्मराज सोनके यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व कर्मचाºयांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
बोर्ली पंचतन येथे गणपतीचे समुद्रामध्ये विसर्जन करण्यासाठी संदेश म्हसकर, दिनेश म्हसकर, केशव गायकर, ओमकार गायकर, यशवंत गायकर, गजानन गायकर, विनोद धनावडे असे सात जण गेले. समुद्राच्या आलेल्या लाटेने त्यांना आत खेचून घेतले व त्यांची बाहेर पडण्यासाठी धडपड सुरू झाली . हे पाहून दिघी सागरी पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार कृष्णा जागडे व उपस्थित काहींनी तत्काळ समुद्रकिनारी असणाºया प्रीतम भुसाणे या जीवरक्षकास व सागरी रक्षक मनोहर गोपाळ रघुवीर व लाया लखमा चोगले यांना बोलाविले. यांनी क्षणात आपल्या जीवाची पर्वा न करता पाण्याचा अंदाज घेत सर्व सात जणांना सुरक्षित बाहेर काढले. संदेश म्हसकर व दिनेश म्हसकर यांना डॉक्टरांनी उपचार केल्यानंतर त्यांना घरी सोडण्यात आले.
गणपती विसर्जन घाटाची दुरवस्था
बोर्ली पंचतन येथील छोट्या नदीवर गणेश विसर्जन करण्यात येत असे. यासाठी ग्रामपंचायतीच्या निधीमधून गणपती विसर्जन घाट देखील बांधण्यात आला आहे, परंतु विसर्जन घाट नदीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये माती साचल्याने व तेथील पाणी दुर्गंधीयुक्त असल्याने याठिकाणी गणेश विसर्जन कसे होणार या कारणामुळे बोर्ली पंचतन येथील सर्व गणपतींचे विसर्जन नजीकच्या काही वर्षांपासून २ किलोमीटरवर असलेल्या दिवेआगर समुद्रकिनारी करण्यात येत आहे.यासाठी ग्रामपंचायत देखील मूर्ती वाहून नेण्यासाठी गाड्या उपलब्ध करते, तसेच गणेशभक्त देखील विसर्जन चांगल्या पध्दतीने होण्यासाठी ५०० ते १००० रुपयांपर्यंत खर्च करीत गणेशमूर्तींसह दिवेआगरचा किनारा गाठतात. बोर्ली पंचतन येथील विसर्जन घाट सुशोभित व गणेश विसर्जनासाठी चांगला तयार केला असता तर बोर्लीकरांना दिवेआगर येथे विसर्जनासाठी जाण्याचे कारणच नव्हते व जर सात जणांचे यात काही बरेवाईट झाले असते तर त्यास जबाबदार कोण होते, अशा निराशाजनक प्रतिक्रि या उमटत आहेत.