लाटांच्या तडाख्यांनी पीरवाडी बीचची दुरवस्था

By admin | Published: July 10, 2016 12:35 AM2016-07-10T00:35:06+5:302016-07-10T00:35:06+5:30

आठ दिवसांपासून उसळलेल्या महाकाय लाटांच्या तडाख्यांनी पर्यटकांसाठी आकर्षण असलेला पीरवाडी बीचवरील सागरीकिनारा पार उद्ध्वस्त झाला आहे. लाटांच्या तडाख्यातून

Survivors of Pirwadi Beach | लाटांच्या तडाख्यांनी पीरवाडी बीचची दुरवस्था

लाटांच्या तडाख्यांनी पीरवाडी बीचची दुरवस्था

Next

उरण : आठ दिवसांपासून उसळलेल्या महाकाय लाटांच्या तडाख्यांनी पर्यटकांसाठी आकर्षण असलेला पीरवाडी बीचवरील सागरीकिनारा पार उद्ध्वस्त झाला आहे. लाटांच्या तडाख्यातून स्मशानभूमी आणि सागरीकिनाऱ्यावरील सिमेंट काँक्रीटचा रस्ताही पार वाहून गेला आहे. त्यामुळे बीचवर जाण्याचा मार्गही बंद झाला असल्याने पर्यटकांची मोठी गैरसोय झाली आहे.
उरण तालुक्यातील नागाव ग्रामपंचायतीच्या हद्दीलगतच असलेला पीरवाडी बीच पर्यटकांना नेहमीच आकर्षिक करीत आला आहे. फेसाळलेला समुद्र, रुपेरी वाळू आणि या वाळूत चालण्याबरोबरच समुद्रात पोहण्याचा आनंद लुटण्यासाठी सुटीच्या दिवशी नेहमीच पर्यटकांची गर्दी असते. याच पीरवाडी बीचवर गणपती सणात परिसरातील हजारो गौरी - गणपतींचे विसर्जन केले जाते. निसर्गरम्य वातावरणाची हौसी पर्यटकांना भुरळ पाडणाऱ्या या पीरवाडी बीचची समुद्राच्या महाकाय लाटांनी पार दुरवस्था झाली आहे.
उरण परिसरातील विविध ठिकाणी विकासकामांच्या आणि प्रकल्प उभारणीच्या नावाखाली सातत्याने समुद्रात सुरू असलेल्या भरावामुळे समुद्राच्या पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणात वाढत चालली आहे. त्यामुळे समुद्राच्या भरतीचे पाणी किनारपट्टीची सागरी सीमा ओलांडून आणि बांधबंदिस्ती उद्ध्वस्त करीत गावांकडे शिरू लागले आहे. समुद्राचे पाणी पीरवाडी बीचवरील किनार उद्ध्वस्त करीत सुमारे १० मीटरपर्यंत आत घुसले आहे. यामध्ये किनाऱ्यावरील नारळी - पोफळीची अनेक झाडे मुळापासून उन्मळून पडली आहेत.
स्मशानभूमीची अवस्थाही अत्यंत गंभीर झाली आहे. स्मशानभूमीची तटबंदी उद्ध्वस्त झाली आहे. पीरवाडी किनाऱ्यावर आणि स्मशानभूमीकडे जाणारा सिमेंट काँक्रीटचा १० फूट रुंदीची रस्ताही पार उद्ध्वस्त झाला आहे. त्यामुळे किनाऱ्यावर ये - जा करण्यासाठी पर्यटकांना अवघड होऊन बसले आहे. तत्काळ दुरुस्ती न झाल्यास पीरवाडी बीच पर्यटकांसाठीच नव्हे, तर गणपती विसर्जनासाठीही बंद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
पीरवाडी किनाऱ्यावर संरक्षण तटबंदी उभारण्यासाठी मध्यंतरी ओएनजीसी, बंदर विभागाने प्रयत्न चालविले होते. मात्र ग्रामस्थांच्या अंतर्गत राजकीय वादामुळे पीरवाडी किनाऱ्यावर संरक्षण तटबंदी उभारण्यासाठी मध्यंतरी ओएनजीसी, बंदर विभागाने प्रयत्न सफल होऊ शकले नसल्याचा आरोप ग्रामस्थांकडून केला जात आहे.
पीरवाडी बीचची झालेली दुरवस्था आणि उद्ध्वस्त झालेली सागरीकिनारपट्टी, स्मशानभूमी आणि रस्त्याची शनिवारी (९) शिवसेना आमदार मनोहर भोईर आणि उरण तहसीलदार कल्पना गोडे यांनी पाहणी केली.

पीरवाडी बीचच्या विकासाचा विषय येत्या पावसाळी अधिवेशनातच प्राधान्याने मांडला जाईल. पीरवाडी बीचच्या विकासासाठी आवश्यक निधीची मागणीही येत्या पावसाळी अधिवेशनात मंजूर करून घेण्याचे प्रयत्न आहे. त्याशिवाय पीरवाडी बीचवरील रस्ता, स्मशानभूमीच्या विकासासाठी आणि गणपती विसर्जनाची गैरसोय होऊ नये, यासाठी आमदार निधीतून तत्काळ काम करून घेण्यात येईल. - मनोहर भोईर, आमदार

पीरवाडी बीचवरील नैसर्गिक आपत्तीमध्ये झालेल्या नुकसानीबाबत पंचनामा करून जिल्हाधिकाऱ्यांकडे अहवाल पाठवून देणार आहे. त्यांनतर परिसराचे सुशोभीकरण करण्यात येईल.
- कल्पना गोडे, तहसीलदार

Web Title: Survivors of Pirwadi Beach

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.