समुद्रकिनारी संशयित बोट किंवा व्यक्ती आढळल्यास पोलिसांना तात्काळ कळवा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2019 12:16 AM2019-07-18T00:16:57+5:302019-07-18T06:49:56+5:30
सर्व सागर रक्षक दलांनी देशाच्या सुरक्षेकरिता समुद्रकिनारी संशयित बोटी किंवा व्यक्ती दिसल्यास त्याच्याकडे लक्ष ठेवून जवळील पोलीस ठाण्यात कळवावे.
आगरदांडा : सर्व सागर रक्षक दलांनी देशाच्या सुरक्षेकरिता समुद्रकिनारी संशयित बोटी किंवा व्यक्ती दिसल्यास त्याच्याकडे लक्ष ठेवून जवळील पोलीस ठाण्यात कळवावे. आपल्या देशावर हल्ले झाले, ते समुद्र मार्गे झाले आहेत, ते पुन्हा होऊ नये त्याकरिता समुद्रकिनारी सुरक्षारक्षकांनी व स्थानिक नागरिकांनी लक्ष ठेवून पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस निरीक्षक किशोर साळे यांनी केले.
रायगड जिल्ह्याला सुमारे १७५ किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभला असल्याने हा जिल्हा सागरी सुरक्षिततेच्या दृष्टीने अतिशय संवेदनशील आहे. त्याकरिता सागरी सुरक्षिततेकरिता सागर रक्षक दलाचे सदस्य, मच्छीमार बांधव व एकत्रितपणे प्रभावी काम करण्यासाठी मुरुड पोलीस ठाण्याच्यावतीने काशीद येथे सागर सुरक्षारक्षक सदस्य मेळावा कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. यावेळी साळे बोलत होते. मच्छीमारांनी योग्य चॅनेलचाच वापर करा. सर्र्वांनी जागृत रहा, समुद्रात मच्छीमारी करताना कोणतीही संशयित बोट आढळली तर तात्काळ माहिती देणे. मच्छीमारांनी आपल्या बोटीची कागदपत्रे बोटीमध्ये ठेवावेत असे यावेळी नेव्हीचे डेप्युटी कमांडंट सलमान खान यांनी मच्छीमार बांधवांना सांगितले.
ओएनजीसी अधिकारी स्वप्निल म्हात्रे यांनी ओएनजीसीकडून समुद्रालगत असलेल्या गावांना शौचालय बांधणे, शाळेला मदत अशा प्रकारच्या मदत केली जाईल असे स्पष्ट के ले.
मच्छीमार बांधव प्रसाद आंबटकर यांनी आम्हाला स्मार्ट कार्ड द्यावेत अशी सूचना केली.कारण आधारकार्ड चेकिंगकरिता नेव्ही अधिकारी यांनी मशीन ठेवाव्यात जेणे करून भारतीय नागरिक असल्याचे तात्काळ ओळखले जावू शकते. परंतु असे न करता आम्हा मच्छीमारांना नाहक त्रास सहन करावा लागतो.
यावेळी पोलीस निरीक्षक किशोर साळे, सरपंच नम्रता कासार, नेव्हीचे डेप्युटी कमांडंट सलमान खान,ओएनजीसी अधिकारी स्वप्निल ठाकूर , पोलीस हवालदार विश्वनाथ पाटील, ग्रामपंचायत सदस्य संतोष राणे, मेरीटाईम बोर्डचे अधिकारी राहुल होले आदी उपस्थित होते.