हुतात्मा कोतवाल व्यायाम मंदिर मैदानावरील बांधकामाला स्थगिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2019 12:19 AM2019-05-16T00:19:49+5:302019-05-16T00:19:57+5:30
हुतात्मा कोतवाल व्यायाम मंदिर मैदानावर सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामाबाबत कारवाई करावी, अशी मागणी बचाव समितीच्यावतीने करण्यात येत आहे.
कर्जत : हुतात्मा कोतवाल व्यायाम मंदिर मैदानावर सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामाबाबत कारवाई करावी, अशी मागणी बचाव समितीच्यावतीने करण्यात येत आहे. तसेच हे मैदान, मैदान म्हणून राहावे अशी मागणी जोर धरत होती. लोकभावनांचा विचार करून मुख्याधिकारी कर्जत नगरपरिषद यांनी बांधकाम करण्याचा अर्ज फेटाळून लावत, मैदानावर सुरू असलेल्या बांधकामाबाबत स्थगिती आदेश दिले आहेत.
धर्मदाय आयुक्त व नगरपरिषद तसेच जिल्हाधिकारी कार्यालय यांच्याकडे तक्रारी दाखल करण्यात आलेल्या होत्या. तसेच नागरिकांनी व विविध संस्थांनी याबाबत हरकती घेत सुस्थितीत असलेली व्यायामशाळा पाडण्यास व मैदानाच्या विकासास विरोध दर्शवला होता. त्याबाबत जनभावना व कायदेशीर बाबी लक्षात घेऊन मुख्याधिकारी कर्जत नगरपरिषद यांनी बांधकाम करण्याचा अर्ज फेटाळून लावला आहे व मैदानावर सुरू असलेल्या बांधकामाबाबत स्थगिती आदेश दिले आहेत. त्यामुळे सतत भूमिका बदलणाऱ्या कार्यकारी मंडळाला झटका बसला आहे. समितीचे समन्वयक वकील हृषीकेश जोशी यांनी आपले सरकार या पोर्टलवर अनधिकृत बांधकाम तयारी सुरु असल्याबाबत तक्रार दाखल केली होती. त्या अनुषंगाने कर्जत नगरपरिषदेमध्ये ईमेलद्वारे कागदपत्रे व पुरावे सादर केले होते. तसेच मुख्याधिकारी कर्जत नगरपरिषद यांना लीगल नोटीस पाठवली होती. या कारवाईबाबत जोशी यांनी तात्पुरत्या दिलाशाबद्दल समाधान व्यक्त केले. मैदानावर खेळणाºया लहान मुलांना वेठीस धरले व तिथे मैदानात परवानगी नसताना बांधकाम सुरू ठेवले म्हणून एम.आर.टी. पी. कायद्यानुसार कृत्यास जबाबदार व्यक्तीवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच ही जागा हे १८७२ सालापासूनचे मैदान असून इतर जागाप्रमाणे लिलावात न देता ते १९६६ साली सरकारने मैदान म्हणून दिले आहे.
तहसील कार्यालयाने याबाबत अटी आणि शर्थी घालून हे मैदान संस्थेस कब्जाहक्काने दिले आहे. संस्थेने तहसीलदार यांच्या आदेशातील निहित अटी आणि शर्थीचा भंग केल्याने भविष्यात हे लोकांचे मैदान संस्थेकडेच राहिल्यास त्याचा परत गैरवापर होऊ शकेल याची भीती जनतेस असल्याने हे मैदान तातडीने शासनजमा करावे अशी मागणी बचाव समितीने जिल्हाधिकारी कार्यालय यांच्याकडे केली होती. व्यायामशाळा ही संस्थेच्या मालकीची नाही व ती संस्थेने विकत घेतली नसताना संस्थेने तिची खोटी मालकी कथन केली आहे. ती धोकादायक आहे असा खोटा दाखला कर्जत नगरपरिषदेतील कर्मचाऱ्यांना हाताशी धरून संस्थेने दिला आहे असे वकील हृषीकेश जोशी यांचे म्हणणे आहे. कर्जतमधील अनेक बांधकाम घोटाळे समोर आले असताना ही जागा सुद्धा गिळंकृत करणार का? असा सवाल जनता आता विचारत आहे.
या बांधकामास परवानगी नाकारण्यात आली आहे, याबाबत धर्मदाय कार्यालयातून स्पष्टीकरण मागविण्यात आले आहे.
- रामदास कोकरे, मुख्याधिकारी,
कर्जत नगरपरिषद