अलिबाग : जगातील काही देशांमध्ये कोरोना व्हायरसने थैमान घातले असतानाच पनवेल तालुक्यामध्ये इराणमधून आलेले चार जण कोरोनाचे संशयित सापडले आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी प्रसारमाध्यमांना दिली. मात्र दोनच तासांमध्ये जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रमोद गवई यांनी याचा इन्कार केला आहे. प्रशासनातील दोन्ही अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीमध्ये विरोधाभास असल्याचे दिसत आहे. या प्रकरणी नक्की कोण खरे बोलत आहे, याबाबत नागरिकांमध्ये संभ्रम आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.अलिबागमधील काही पत्रकारांनी जिल्हाधिकारी निधी चौधरी यांची काही कामानिमित्त भेट घेतली. त्या वेळी त्यांनी पनवेल तालुक्यामध्ये चार जण हे इराणमधून आले आहेत. त्यांना सर्दी, खोकला आणि ताप आल्याने त्यांची तपासणी करण्यात आली. त्यानंतर त्या संशयितांच्या थुंकी आणि रक्ताचे नमुने पुण्यातील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आल्याचे चौधरी यांनी सांगितले. दरम्यानच्या कालावधीमध्ये रायगडचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रमोद गवई हे अधिक तपासणीसाठी पनवेलला रवाना झाले होते.डॉ. गवई हे पनवेलला पोहोचल्यावर त्यांनी तेथील वैद्यकीय अधिकारी डॉ. पद्ममा बर्फे यांची भेट घेऊन संशयितांची केस हिस्ट्री तपासली. त्यांच्यामध्ये कोरोना व्हायरसची कोणतीच लक्षणे आढळली नाहीत. त्यामुळे त्यांच्या रक्ताचे आणि थुंकीचे नमुने पाठवण्याचा प्रश्नच नाही, असे डॉ. प्रमोद गवई यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. या संशयितांची भेट घेतली. त्यांना सायनसचा त्रास होता, आता त्यांची तब्येत ठीक आहे. संबंधित संशयितांबरोबर हस्तांदोलनही केल्याचे डॉ. गवई यांनी सांगून त्यांना कोरोना व्हायरसची लागण झाली नसल्याबाबत क्लीन चिट दिली.जिल्ह्याचे प्रमुख म्हणून जिल्हाधिकारी माहिती देतात तेव्हा ती विश्वसनीय असते, मात्र काही तासांतच आरोग्य विभागाने ते संशयित रुग्ण नव्हतेच, असे सांगून टाकले आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला. जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.>पुन्हा तपासणी का?ं११ फेब्रुवारी २०२० रोजी तीन नागरिक हे इराणहून मुंबईमध्ये आले होते, तर एक नागरिक हा २१ फेब्रुवारी २०२० रोजी आला होता, अशी माहिती डॉ. गवई यांनी दिली. त्या वेळी विमानतळावर जागतिक आरोग्य संघटनेच्या निकषानुसार स्कॅनिंग मशिन होते का, असाही प्रश्न आहे. स्कॅनिंग मशीन होते असे मानले तर आलेल्या रुग्णांची पुन्हा तपासणी का करण्यात आली, असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.
परस्परविरोधी भूमिकेमुळे प्रशासनावरच संशय, रायगडमध्ये कोरोनाचे चार संशयित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 07, 2020 12:39 AM