- सिकंदर अनवारे, दासगावमहाड तालुक्यातील कुंबळे गावात लग्नाच्या जेवणात विषबाधा झाली होती. आतापर्यंत जवळपास दीडशेच्या वर रुग्णांना याची बाधा झाली आहे. या प्रकरणी अन्न औषध प्रशासन विभागाच्या पथकाने महाडमध्ये धाव घेऊन येथील जेवणाचे नमुने ताब्यात घेतले आहेत. या ठिकाणी वापरण्यात आलेल्या खव्याची मुदत दोनच दिवसांपूर्वी संपली असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. सोशल मीडियावर स्थानिक नागरिकांनी खव्याच्या पाकिटाचे फोटो टाकल्यानंतर हा संशय निर्माण झाला आहे. या घटनेनंतर अन्न प्रशासन विभागाने महाडमधील महाबळेश्वर स्वीट मार्ट आणि ए वन कॅटरर्स या दोन्ही दुकानांची तपासणी केली.कुंबळे गावात जैन्नुद्दीन कादिरी यांच्या मुलाचा विवाहात राजकीय, सामाजिक, धार्मिक क्षेत्रातील दिग्गजांची हजेरी होती. दुपारी लग्न सोहळा पार पडल्यानंतर मटणाची तसेच दुधी-हलव्याची दावत देण्यात आली. मात्र जेवण केल्यानंतर काही तासांतच जेवण केलेल्या पाहुण्यांना उलटीचा त्रास जाणवू लागला. विषबाधा झाल्याचे कळल्यानंतर कुंबळे आणि महाड परिसरातील जवळपास दोनशेच्या वर रुग्ण महाडमधील विविध रुग्णालयांत उपचार घेत आहेत. या घटनेनंतर महाडच्या उपविभागीय अधिकारी प्रांजल सोनवणे यांनीदेखील घटनास्थळी धाव घेतली. या ठिकाणचे जेवणाचे नमुने त्यांनी ताब्यात घेतले. याबाबत अन्न औषध प्रशासन विभागाचे एक पथक महाडमध्ये दाखल झाले आहे. यामधील अन्न औषध विभागाचे अधिकारी आर. एस. बोडके, आर. बी. कुलकर्णी यांच्या पथकाने दोन्ही दुकानांची तपासणी केली. या वेळी महाड तालुका पोलिसांनी जप्त केलेले जेवणाचे नमुनेदेखील ताब्यात घेतले आहेत. या घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी महाडमधील ही दोन्ही दुकाने बंद केली. विषबाधा प्रकरणी जेवणाचे नमुने महाड पोलिसांकडून ताब्यात घेत असून, या नमुन्यांच्या तपासणी अहवालानंतर दोषींवर कारवाई केली जाईल.- आर. एस. बोडके, अन्न औषध प्रशासन अधिकारी
‘ती’ विषबाधा खव्याने झाल्याचा संशय
By admin | Published: March 28, 2016 12:43 AM