रबाळे वाहतूक पोलिसांच्या कारवाईवर संशय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2018 03:00 AM2018-06-02T03:00:03+5:302018-06-02T03:00:03+5:30
वाहतूक पोलिसांकडून केल्या जाणाऱ्या कारवाईत भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप होवू लागला आहे. खासगी व्यक्तींचा वापर होत असल्याचाही संशय आहे
नवी मुंबई : वाहतूक पोलिसांकडून केल्या जाणाऱ्या कारवाईत भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप होवू लागला आहे. खासगी व्यक्तींचा वापर होत असल्याचाही संशय आहे. भाजपाचे दिघा तालुका अध्यक्ष त्रिभुवन सिंह यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली आहे.
अवैधरीत्या रस्त्यावर उभ्या केल्या जाणाºया वाहनांवर वाहतूक पोलिसांकडून कारवाईचा धडाका सुरू आहे. संपूर्ण शहरात अशा प्रकारे मोठ्या संख्येने कारवाया होत आहेत. मात्र दिघा वाहतूक पोलिसांकडून अशा कारवाया होत असताना खासगी व्यक्तींमार्फत भ्रष्टाचार केला जात असल्याचा आरोप होवू लागला आहे. भाजपाचे दिघा तालुका अध्यक्ष त्रिभुवन सिंह यांनी यासंदर्भात लाचलुचपत प्रतिबंधक विभाग तसेच वाहतूक पोलीस उपआयुक्तांकडे तक्रार केली आहे. काही दिवसांपूर्वी सिंह यांची मोटारसायकल रस्त्यालगत उभी असताना वाहतूक पोलिसांनी टोविंग करून नेली होती. ही मोटारसायकल सोडवण्यासाठी ते रबाळे वाहतूक शाखेत गेले असता, तिथे अगोदरच थांबलेल्या खासगी व्यक्तीने त्यांच्याकडे दुचाकी सोडवण्यासाठी १३०० रुपयांची मागणी केली. यावेळी सिंह यांनी त्यांना प्रतिसाद न देता तिथल्या वाहतूक पोलिसाकडे चौकशी केली असता, त्याने देखील खासगी व्यक्तीकडे बोट दाखवून त्याने सांगितलेली रक्कम त्याच्याकडे द्या व वाहन सोडवून न्या असा सल्ला दिल्याचे सिंह यांचे म्हणणे आहे. परंतु टोविंग केलेली मोटारसायकल सोडवण्यासाठी १३०० रुपये कसे असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला असता, खासगी व्यक्तीने त्यांच्याकडे वाहनाच्या कागदपत्रांची मागणी केली. अखेर आपल्याकडे तेवढी रक्कम नसल्याचे सांगितल्यानंतर ५०० रुपयांवर तडजोड करून पावती न देता दुचाकी सोडून दिल्याचेही सिंह यांचे म्हणणे आहे.