नेरळ : नेरळ विकास प्राधिकरणामध्ये कोट्यवधींचा निधी शिल्लक असूनही दर्जेदार रस्ते बनविले जात नाहीत. नेरळ पाडा येथून कोल्हारे खिंडी-कशेळे रस्त्यापर्यंत रस्त्याचे काम मंजूर करण्यात आले आहे. येथील वर्दळ पाहता आरसीसी काँक्रीटचे काम होणे आवश्यक आहे. मात्र, रायगड जिल्हा परिषदेकडून डबर, सिमेंट भरून रस्ता तयार केला जात आहे. मात्र, हे रस्ते अवघ्या काही दिवसांत खड्डेमय होत असल्याने नागरिकांची गैरसोय होते. नेरळ विकास प्राधिकरणकडे कोट्यवधींचा निधी उपलब्ध असताना लोखंड वापरून आरसीसीचा दर्जेदार रस्ता का बनविला जात नाही? असा प्रश्न नागरिकांकडून विचारण्यात येत आहे.
नेरळ, कोल्हारे आणि ममदापूर ग्रामपंचायतीमधील विकासकामे करण्यासाठी नेरळ विकास प्राधिकरणमधून स्वतंत्र निधी उपलब्ध आहे. विकासकामांसाठी ५० कोटींचा निधी शिल्लक आहे. दोन वर्षांनंतर नेरळ गावातील काही रस्त्यांची कामे मंजूर झाली आहेत. कामे मंजूर करताना प्राधिकरणावर नियंत्रण असलेल्या जिल्हा परिषदेने कामांसाठी दर्जात तडजोड केली आहे. हे रस्ते आरसीसी काँक्रीटचे व्हावेत, या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते विजय हजारे यांनी रिक्षा संघटना यांच्या माध्यमातून दोन वेळा उपोषण केले. दोन्ही वेळा त्यांना आश्वासने देण्यात आली. मात्र, त्यांची पूर्तता झालीच नाही.
नेरळ रस्त्यावर दिवसरात्र वर्दळ सुरू असते. त्यामुळे या ठिकाणी दर्जेदार, पक्के काम होणे आवश्यक असताना त्यात तडजोड केली जात आहे.नेरळ विकास प्राधिकरण हद्दीमधील रस्ते आरसीसी काँक्रीटचे करण्यासाठी आवश्यक असलेला निधी अद्यापदेखील शिल्लक आहे. मात्र, गाजावाजा करून काही रस्त्यांचे भूमिपूजन जिल्हा परिषदेचे प्रभारी अध्यक्ष आस्वाद पाटील यांनी केले.
नेरळ गावातील अनेक रस्ते आरसीसी पद्धतीने लोखंड वापरून केले जात आहेत. अशा प्रकारचे टिकाऊ रस्ते बनविण्यास रायगड जिल्हा परिषदेच्या नेरळ विकास प्राधिकरणकडे निधीदेखील आहे. मात्र, रस्ते झाल्याचे दाखवून लोकांची फसवणूक करण्याचा प्रकार नेरळमध्ये सुरू आहे. नेरळ गावातील सात रस्त्यांची कामे मंजूर करण्यात आली असून, सर्व रस्ते खडी, डबर, सिमेंट टाकून तयार केले जात आहेत. मात्र, हे रस्ते वर्षभरात उखडत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
नेरळ गावातील पूर्व भागात तीन आणि मुख्य गावात दोन आणि पश्चिम भागात तीन अशी सात रस्त्यांची कामे मंजूर आहेत. त्यातील पाडा ते कोल्हारे खिंडीतून कशेळे रस्त्यावर प्रचंड वाहतूक असते आणि त्या रस्त्यावर लोखंडी सळ्या घालून रस्ता बनविण्याची गरज होती; पण तसे झाले नसल्याने रस्त्याच्यादर्जाबाबत आणि टिकाऊपणाबाबत शंका निर्माण झाली आहे. त्यात या रस्त्यात मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची वर्दळ लक्षात घेऊन आरसीसी पद्धतीने काम करण्याची गरज असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
नेरळ परिसरातील रस्त्याची कामांसंदर्भात आम्हाला आदेशाप्रमाणे अंदाजपत्रक बनवून निधी दिला जातो. त्याप्रमाणे कामे केली जातात. हे काम अधिकाधिक दर्जेदार करण्यावर भर आहे.- प्रवीण आचरेकर, उपअभियंता, नेरळ विकास प्राधिकरण
आपल्या प्रभागात आवश्यक असलेली कामे मंजूर व्हावीत यासाठी माझा पुढाकार होता. मंजूर झालेली कामे कोणत्या प्रकारचे आहे, हे माहीत नाही. मात्र, चांगली कामे झाली पाहिजेत, यासाठी पाठपुरावा करणार आहे.- अनसूया पादिर, सदस्य, रायगड जिल्हा परिषद
हुतात्मा हिराजी पाटील नगरातील रस्ता मंजूर झाला आहे. हे काम आरसीसी पद्धतीने होणे अपेक्षित होते. मात्र, तसे होत नसल्याने रस्त्याच्या दर्जाबाबत संशय व्यक्त होत आहे.- संतोष धुळे, रहिवासी
कशेळे रस्त्याने नेरळ गावात येण्यासाठी शॉर्टकट रस्ता म्हणून कोल्हारे खिंडीतील रस्त्याचा वापर नागरिकांकडून केला जातो. त्या रस्त्याने मोठ्या प्रमाणात अवजड वाहने ये-जा करीत असतात. त्यामुळे नेरळ गावात एमएमआरडीएने केलेल्या रस्त्याप्रमाणे निधी टाकून दर्जेदार रस्ता करायला हवा होता. डबर टाकून केलेला रस्ता टिकाव धरणार नाही.- शशिकांत मोहिते, रहिवासी