करंजा बंदरातील संशयित बोट ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2022 01:16 PM2022-09-27T13:16:44+5:302022-09-27T13:17:01+5:30
कस्टम, पोलीस, मत्स्यव्यवसाय विभागाच्या अधिकाऱ्यांकडून तपासणी
उरण : करंजा-उरण येथील बंदरात मत्स्यव्यवसाय विभागाच्या अधिकाऱ्यांना एक संशयित मच्छीमार बोट आढळून आली आहे. नाव, नंबर, कागदपत्रे नसलेली ही संशयित मच्छीमार बोट सोमवारी उरण पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतली. कस्टम, पोलीस, मत्स्यव्यवसाय विभागाच्या अधिकाऱ्यांकडून चौकशी सुरू आहे.
करंजा येथे नव्याने उभारण्यात येत असलेल्या मच्छीमार बंदरात एक संशयित बोट असल्याची माहिती मत्स्यव्यवसाय विभागाचे परवाना अधिकारी सुरेश बागुलगावे यांना मिळाली होती. त्यांनी सहकाऱ्यांसह मच्छीमार बोटीची पाहणी केली. त्यात बोटीचे नाव, नंबर, कागदपत्रे आढळून आली नाहीत.
अकबर नावाचा मजूर बोटीत आढळला. त्याच्याकडे अधिकाऱ्यांनी चौकशी केल्यानंतर समाधानकारक उत्तरे मिळाली नाहीत. बोटीवर अनेक संशयास्पद बाबी आढळून आल्याने, संशयित मच्छीमार बोट अधिक चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आली.
तूर्तास संशयित मच्छीमार बोट ताब्यात घेण्यात आली आहे. मत्स्यव्यवसाय विभाग, कस्टम अधिकाऱ्यांकडून चौकशी केली जात आहे.
सुनील पाटील,
वरिष्ठ पोलीस निरीक्षक