- दत्ता म्हात्रे पेण : रब्बी हंगामातील शाश्वत उत्पन्न देणारे पीक म्हणून शेतकरी वाल पिकाला प्राधान्य देतात. गतवर्षी खरीप हंगामात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडल्याचा फायदा जमिनीत ओलावा टिकून राहण्यासाठी झाला. खरीप हंगाम संपताक्षणी जमिनीतील ओलावा दोन ते तीन महिने टिकेल, असा तर्क बांधून यंदा रब्बी हंगामात ५० ते ६० एकर शेतीत वालपीक लागवड करण्यात आली आहे.सध्या पेण तालुक्यातील ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात वालाची शेती बहरल्याने शेतकरी सुखावला आहे. वालाच्या शेंगा चवीला रुचकर असल्याने प्रति किलो ५० ते ६० दराने शेंगाची विक्री होत आहे. रब्बी हंगामातील शाश्वत उत्पन्न देणारे पीक सध्या परिसरातील शेतकरी वाल पिकाच्या शेतीलाच प्राधान्य देत आहेत. साधारणपणे नोव्हेंबर महिन्यात वाल पीक ओलावा असलेल्या जमिनीत पेरले जाते. पीक संरक्षणासाठी शेतीला सभोवार काटेरी कुंपण घातले की, शेतकरी निर्धास्त होतो. त्यानंतर एकदा का बी रुजून कोंब फुटले की, अल्पावधीतच शेती बहरू लागते. त्यानंतर खतांची अल्पप्रमाणात मात्रा दिली की, जेवढे थंड हवामान तेवढा फायदा पिकाला होतो.यंदा जमिनीला ओलावा, थंड व अनुकूल हवामान मिळाल्याने पीक जोमदार आल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. मार्च महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात वालाच्या शेंगा परिपक्व होऊन पीक काढणीला येईल. वेलवर्गीय प्रकारातील हे पीक शेतकऱ्यांना यंदा चांगली आर्थिककमाई करून देणार असल्याने शेतकºयांकडून समाधान व्यक्त होत आहे.उत्पादन अधिक व खर्च कमी असल्याने फायदेशीरपेण ग्रामीण भागातील करोनी, दुरशेत, जिते, आंबिवली, बळवली अशा बाळगंगा नदीखोºयातील भागात वालशेती मोठ्या प्रमाणात केली जाते. याशिवाय पाटणोली, वाशी नाका, पाबळ खोरे व हेटवणे धरणाच्या परिसरातील शेतकरीही वेलवर्गीय पिके मोठ्या प्रमाणात घेत आहेत. उत्पादन अधिक व खर्च कमी असल्याने शेतकºयांसाठी ही शेती फायदेशीर ठरत आहे. वालाच्या शेंगा व कडधान्यातील वालाला चांगला भाव मिळतो. वालाची विक्री प्रतिकिलो १३० ते १४० रुपये दराने केली जात आहे.
शाश्वत उत्पन्न देणारी वालशेती बहरली; बळीराजा सुखावला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2020 10:53 PM