किल्ले रायगडावर उत्खननात सापडला स्वराज्याचा ठेवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2018 02:45 AM2018-03-26T02:45:14+5:302018-03-26T02:45:14+5:30
स्वराज्याची राजधानी म्हणून जगभरात कीर्ती असलेल्या किल्ले रायगडावर आता ऐतिहासिक ठेवा सापडण्यास सुरूवात झाली आहे.
संदीप जाधव
महाड : स्वराज्याची राजधानी म्हणून जगभरात कीर्ती असलेल्या किल्ले रायगडावर आता ऐतिहासिक ठेवा सापडण्यास सुरूवात झाली आहे. प्राधिकरणाअंतर्गत सुरू करण्यात आलेल्या किल्ले रायगडच्या संवर्धनाला आता सुरूवात झाली असून यासाठी होत असलेल्या शास्त्रीय उत्खननात शिवकालीन शस्त्रे अस्त्रे यांचे अवशेष तसेच शिवकालीन नाणी व अत्यंत दुर्मीळ अशा काही पुरातन वस्तू व वास्तूंचे अवशेष सापडू लागल्याने शिवप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. स्वराज्याच्या राजधानीत अवघ्या काही फुटांवर हा ऐतिहासिक ठेवा सापडू लागल्याने प्राधिकरणाचे अध्यक्ष व खासदार संभाजी राजे यांनी रविवारी गडाला भेट देऊन पाहणी केली.
रायगडच्या संवर्धनासाठी राज्य सरकारने खासदार छत्रपती संभाजी राजे यांच्या अध्यक्षतेखाली एका स्वतंत्र प्राधिकरणाची नियुक्ती केल्यानंतर भारतीय पुरातत्व विभागाच्या सर्व परवानगी घेऊन संवर्धनाच्या कामाला सुरूवात करण्यात आली आहे. सध्या रायगडावर डेक्कन विद्यापीठाच्या देखरेखीखाली काही ठिकाणी शास्त्रीय पद्धतीने उत्खनन सुरू आहे. काही मोजकी ठिकाणे यासाठी निवडण्यात आली आहेत. साधारणत: दीड ते दोन फुटांपर्यंत उत्खनन केल्यानंतर शिवकालीन शस्त्रे अस्त्रे यांचे अवशेष, शिवकालीन नाणी, त्या काळात वापरल्या जाणाऱ्या बंदुकीतील गोळी, तोफेचे अवशेष, नक्षीदार मातीची मडकी, चिनीमातीच्या भांड्यांचे तुकडे, त्याकाळातील विटा, कौले त्याच बरोबर तोफगोळे, शिवकालीन घराच्या दरवाजांचे कडी-कोयंडे, कुलूप, दगडी दिवा, पाटा वरवंटा, तांब्याच्या वस्तू आणि आणखी बरेच काही ऐतिहासिक वस्तू सापडत आहेत. पुणे येथील डेक्कन विद्यापीठात पुरातत्व खात्याचे शिक्षण घेणारे दहा विद्यार्थी त्यांच्या पर्यवेक्षकांसोबत पंधरा दिवसांपासून गडावर दाखल झाले आहेत. संपूर्ण गडाची पाहणी केल्यानंतर काही मोजकीच ठिकाणे उत्खननासाठी निवडण्यात आली.यासाठी कोणत्याही आधुनिक तंत्रज्ञानाचा किंवा अवजारांचा वापर केलेला नसून केवळ कुदळ, फावडी याच अवजारांचा वापर करण्यात आला आहे.
उत्खननासोबतच छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधी, जगदीश्वर मंदिर आणि वाघ्या कुत्र्याच्या समाधीवरतीही शास्त्रीय पध्दतीने रासायनिक प्रक्रि या सुरू आहे. औरंगाबाद येथील पुरातत्वीय विभागाचे सहअधीक्षक यासाठी रायगड किल्ल्यावर तळ ठोकून बसले आहेत. कोकणात पावसाचे प्रमाण अधिक असल्याने या पुरातन वास्तूंना धोका निर्माण होऊ शकतो. दगडी भिंतीवर शेवाळ तयार होऊन दुरवस्था होऊ नये यासाठीची खबरदारी म्हणून ही प्रक्रि या करण्यात आली असून तिचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे.
प्राधिकरणाचे अध्यक्ष व खासदार संभाजी राजे यांनी आज किल्ले रायगडला भेट देऊन प्रत्यक्ष सुरू असलेल्या कामांची पाहणी करून समाधान व्यक्त केले. पुणे येथील डेक्कन विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांचे त्यांनी कौतुक केले.गडावर सापडत असलेल्या ऐतिहासिक वस्तू तसेच वास्तूंचे महत्त्व पहाता आणखी प्रमाणात उत्खनन झाल्यास फार मोठी दौलत शिवप्रेमींना सापडू शकते यासाठी वेळ पडल्यास आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करु , मात्र भारतीय पुरातत्व विभागाला विश्वासात घेऊनच योग्य वेळी योग्य निर्णय घेतला जाईल असे स्पष्ट केले.रायगड व परिसरातील एकवीस गावांच्या तपासणीकरिता हैद्राबाद येथून विशेष मॅप तपासणी टीमला पाचारण करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.