नववर्षाचे जल्लोषात स्वागते, जिल्ह्यातील हॉटेल, रेस्टारंट, लॉजिंग हाउसफुल्ल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2018 07:21 AM2018-01-01T07:21:30+5:302018-01-01T07:22:29+5:30
सरत्या वर्षाला निरोप देताना थर्टीफर्स्टचे सेलिब्रेशनही तेवढ्याच धूमधडक्यात व्हायला पाहिजे. याची किंचितही कसर न राहता स्थानिकांसह पर्यटकांनी हा आनंदी सोहळा अगदी जल्लोषात साजरा केला. या सेलिब्रेशनची धूम इतकी मंत्रमुग्ध करणारी होती की, नववर्षातील सूर्याने क्षितिजावर मनोहरी रंग फेकले, तरी झिंग मात्र कायम होती.
अलिबाग : सरत्या वर्षाला निरोप देताना थर्टीफर्स्टचे सेलिब्रेशनही तेवढ्याच धूमधडक्यात व्हायला पाहिजे. याची किंचितही कसर न राहता स्थानिकांसह पर्यटकांनी हा आनंदी सोहळा अगदी जल्लोषात साजरा केला. या सेलिब्रेशनची धूम इतकी मंत्रमुग्ध करणारी होती की, नववर्षातील सूर्याने क्षितिजावर मनोहरी रंग फेकले, तरी झिंग मात्र कायम होती. नववर्षाच्या निमित्ताने सुरू झालेले हे सेलिब्रेशन पुढील आठवडाभर सुरूच राहणार असल्याचे येथील पर्यटकांच्या संख्येवरून दिसून येते.
२०१७ला निरोप देण्यासाठी सकाळपासूनच पर्यटकांनी मोठ्या संख्येने जिल्ह्यातील महत्त्वाच्या समुद्रकिनारी गर्दी केली होती.
ख्रिसमसपासून सलग सुट्ट्या आल्याने त्या सुट्ट्यांची नशा उतरत नाही. तोच थर्टीफर्स्टच्या सेलिब्रेशनचे प्लॅन पूर्ण झाल्याचे दिसत होते. पर्यटकांनी अलिबाग शहरातील रस्ते गजबजून गेले होते. हॉटेल, रेस्टारंट, लॉजिंग पर्यटकांनी तुडुंब भरले होते. मद्यविक्रीच्या दुकांनामध्ये तळीरामांचा महापूर लोटला होता. अलिबाग, वरसोली, नागाव, आक्षी, किहीम, मांडवा, काशिद, मुरुड, श्रीवर्धनचे समुद्रकिनारे पर्यटकांनी फुलून गेले होते. घोडेसवारी, घोडागाडी, उंटाची सफर, स्पीड बोटीचा थरार, बोटीतून किल्ला दर्शन, एटीव्हीची राइड अशा मनोरंजनांच्या साधनांचा पुरता आनंद पर्यटकांनी नववर्षाच्या पूर्वसंधेला लुटला. समुद्रकिनारी विविध स्टॉल खवय्यांच्या जिभेचे चोचले पुरवत
होते.
विविध हॉटेल, रेस्टारंटमध्ये थर्टीफर्स्टच्या सेलिब्रेशनसाठी विशेष डीजे पार्ट्यांचे आयोजन केले होते. संगीताच्या तालावर नाचत आणि मद्याचे पेले रिचवीच तरुणाईसह वयोवृद्धांनीही सेलिब्रेशनची चांगलीच धूम अनुभवली. काही पार्ट्या या सकाळी ६ वाजेपर्यंत रंगल्या होत्या. त्यामध्ये प्रामुख्याने रेवस आणि मांडवा पट्ट्यामध्ये असलेल्या फार्महाउस, कॉटेज आणि हॉटेल्सचा समावेश होता.
माथेरानमध्ये नववर्षाच्या स्वागतासाठी गर्दी
लोकमत न्यूज नेटवर्क
माथेरान : नवीन वर्षाला निरोप देण्यासाठी पर्यटकांनी माथेरानमध्ये गर्दी केली आहे. हॉटेल्स, लॉजिंग हाउसफुल्ल झालेले आहेत. या वर्षातील अंतर्गत हेवे-दावे विसरून नव्याने आत्मविश्वासी वृत्ती जोपासली जावी. नवीन वर्षात कुटुंबाला सुखसमृद्धी लाभावी आणि एकंदरच २०१८ वर्ष भरभराटीचे जाण्यासाठी सर्वत्र पर्यटकांमध्ये आनंदाचे वातावरण दिसत आहे. येथील दुकानदारांनी दुकानात भरगच्च सामान तसेच लहान-मोठ्या स्टॉल्सधारकांनीसुद्धा पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी सर्व सोयीयुक्त वस्तू ठेवलेल्या आहेत. घोडा आणि हातरिक्षातून पॉइंट्सची मज्जा हौशी पर्यटक घेत आहेत. चिक्की, चप्पल तसेच लेदरच्या बॅग खरेदीसाठी सायंकाळी बाजारपेठा सज्ज असून, सर्वांनाच हा हंगाम धनप्राप्तीसाठी शेवटचा असल्याने जो तो आपापल्या परीने व्यवसाय करण्यात मग्न आहे.
समुद्राच्या साक्षीने सरत्या वर्षाला निरोप
च्रात्री उशिरा अलिबागच्या समुद्रकिनारी स्थानिकांसह पर्यटक मोठ्या संख्येने हजर होते. उलटे आकडे मोजत १२ वाजून १ मिनिटांनी अथांग समुद्राच्या साक्षीने सरत्या वर्षाला निरोप देत, नववर्षाचे सर्वांनी जल्लोषात स्वागत केले. एकमेकांना नववर्षाच्या शुभेच्छा देण्यात आल्या, तर काहीचे मोबाइल खणखणत होते. कुटुंबापासून दूर असणाºयांनी आपापल्या नातेवाइकांना सोशल मीडियावरून शुभेच्छा दिल्या. काहींनी लाइव्ह व्हिडीओ कॉलिंगद्वारे अलिबागमधील थर्टीफर्स्टची धूम शेअर केली. नववर्षाच्या स्वागतासाठी आकाशामध्ये कंदील सोडले. जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.