संजय करडे
मुरूड : दरवर्षी महाशिवरात्र असण्याच्या तीन दिवस अगोदर कोर्लई येथील शेतकरी मोठ्या संख्येने आपल्या शेतात पिकविलेले रताळे विकण्यासाठी मुरुड शहरातील बाजारपेठेत येत असतात. शेकडो टन माल घेऊन येऊन मोठ्या प्रमाणात रताळ्याची विक्री करीत असतात. कोर्लई येथील रताळे खूप प्रसिद्ध असून, ही रताळी विकत घेण्यासाठी मोठी गर्दी होत असते, परंतु यंदा कोरोना व आर्थिक मंदीमुळे लोकांच्या हाताला असणारे काम गमावल्यामुळे रताळी खरेदीसाठी फार अल्प प्रतिसाद मिळत असल्याने दिसून येत आहे. माल विकणाऱ्या व्यापाऱ्यांनी रताळ्याचे भाव कमी करूनही रताळी घेण्यासाठी गर्दी दिसून येत नाही. ग्राहक नसल्याने माल विकणारे व्यापारी त्रस्त व हैराण झाले आहेत.
मागील वर्षी रताळी ८० रुपये किलोने विकली गेली, परंतु यंदा रताळ्याचे पीक भरघोस येऊनही रताळी विकत घेण्यासाठी गिऱ्हाईकच नाही. त्यामुळे उत्कृष्ट रताळी असूनही विक्रीला प्रतिसाद नसल्याने बाजारात शांतता दिसून येत आहे. महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर शेतकरी रताळ्याची शेती मोठ्या प्रमाणात करून भरघोस आवक प्राप्त करण्याचा त्याचा प्रयत्न असतो, परंतु यंदा बाजारातील ग्राहक खरेदी करीत नसल्याने रताळ्याचे भाव मोठ्या प्रमाणात घसरले आहेत. उपवासासाठी लागणारी गावठी लालचुटूक गोड रताळ्यांची कोर्लई गावातून सुमारे ५०० क्विंटलची आवक वाढली आहे.गोड बटाटा अर्थात स्वीट पोटॅटो म्हणून जगभर ओळख असलेले गोड कंदमुळ रताळे बहुधा उपवासासाठी विशेषतः महाशिवरात्रीला वापरले जाते.
४० ते ५० रुपये किलोला दरदरवर्षीप्रमाणे या वर्षी मुरुड नगरपरिषदेतर्फे रताळे बाजारात विद्युत पुरवठा व मंडपाची सुविधा उपलब्ध न केल्यामुळे सुमारे ४० महिला विक्रेतींना पदरमोड करून मंडप घालावा लागल्याचे लोना मार्तिस यांनी सांगितले, तर गेल्या वर्षी ८० ते ९० रुपये किलोला आकारले तरी मागणी होती, परंतु या वर्षी उत्पादन वाढले असून, ४० ते ५० रुपये इतका कमी दर असूनही मालाला अपेक्षित उठाव नसल्याचे महिला बचत गट प्रमुख अजेलीन डिसोझा यांनी सांगितले.
उत्पन्नात गेल्या वर्षापेक्षा दुप्पट वाढयंदा रताळ्याचे उत्पन्न गेल्या वर्षापेक्षा दुप्पट वाढ झाली असून, प्रति किलो ५० रुपये भाव असूनही कोरोनामुळे फारसा रताळ्यांना मागणी नसल्याने शेतकरी तोट्यात असल्याने नाराजीचे वातावरण दिसत आहे. या वर्षी अधिक मास आल्याने रताळे पिकविण्यास पुरेसा अवधी मिळाला. परिणामी, अडीच तीन महिन्यांचा कालावधी मिळाल्याने भरघोस पीक मिळू शकले. मात्र, रताळ्याला मोठ्या प्रमाणावर मागणी नसल्याने जेमतेम उत्पादन खर्च निघाल्याचे रताळी उत्पादक शेतकरी रॉक रुसारीयो यांनी सांगितले.