पेणमध्ये होणार जलतरण तलाव
By admin | Published: December 11, 2015 01:24 AM2015-12-11T01:24:13+5:302015-12-11T01:24:13+5:30
क्रीडा क्षेत्रातील नवोदित व उदयोन्मुख खेळात शालेय व महाविद्यालयीन स्तरावरील किशोर व युवांसाठी स्वीमिंग या प्रकारात शास्त्रशुध्द व तंत्रशुध्द तेथे
पेण : क्रीडा क्षेत्रातील नवोदित व उदयोन्मुख खेळात शालेय व महाविद्यालयीन स्तरावरील किशोर व युवांसाठी स्वीमिंग या प्रकारात शास्त्रशुध्द व तंत्रशुध्द तेथे क्रीडा नैपुण्य प्राप्त व्हावे, पेणमधील खेळाडूंनी स्वीमिंग प्रकारात राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर धडक मारावी या क्रीडाप्रेमी हेतूने पेण पालिकेच्या २०१५-१६ या शतकोतर सुवर्ण महोत्सवी वर्षपूर्ती कार्यक्रमाच्या अनुषंगाने, सव्वा कोटी खर्चाचा अपेक्षित जलतरण तलाव पेण पालिका प्रशासन साकारत आहे. त्याचे बांधकाम अंतिम टप्प्यात आले आहे.
माजी कॅबिनेट मंत्री रवी पाटील यांच्या विकास कल्पनेतून नगराध्यक्षा प्रीतम पाटील व पालिका गटनेते अनिरुध्द पाटील यांच्या सहकाऱ्यांनी हा जलतरण तलाव पेण पालिका तयार करीत आहे.
क्रीडा जगताचा सर्वत्र बोलबाला असल्याने ज्या देशाचे क्रीडाक्षेत्र मजबूत तो देश ताकदवान समजला जातो. आंतरराष्ट्रीय स्पर्धा, आॅलिम्पिक एशियाड व अन्य स्पर्धाबरोबर देशाअंतर्गत खेळल्या जाणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धात पेणच्या नागरी व ग्रामीण उदयोन्मुख खेळाडूंना जाता यावे, यासाठी क्रीडाविषयक सोयी - सुविधावर भर द्यावा हा या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षपूर्ती निमित्ताने पेण पालिका प्रशासनाचा हेतू असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
अल्पावधीत ही संकल्पना राबविली व त्याची त्याच शीघ्र गतीने अंमलबजावणी झाली असल्याचे मुख्याधिकारी जीवन पाटील यांनी सांगितले. पालिका प्रशासनाचा बांधकाम विभाग व अभियंता जागृती पवार व त्यांच्या टीमने जलद गतीने काम करून अल्पावधीत ही किमया साध्य केली आहे. यामुळे आज काम अंतिम टप्प्यात आले आहे. (वार्ताहर)