पोलादपूर : संततधार पावसाने तालुक्यातील नदी दुथडी भरून वाहत असून पोहण्याची हौस अंगाशी येत असल्याचा प्रत्यय सोमवारी पोलादपूर येथील चोळई नदीपात्रात शर्यत लावण्याच्या प्रकारातून दिसून आला. दोन तरुणांनी शर्यत लावली असता पाण्याचा अंदाज न आल्याने तरुण अडकून पडला होता, स्थानिक नागरिक व पोलीस प्रशासनाच्या मदतीने त्यास दोरीच्या साहाय्याने बाहेर काढण्यात यश आले आहे.
पोलादपूर येथील सायली ढाब्याजवळ नदी पात्रात तिसनंदन श्रीहरिदर प्रसाद (२१, रा. बिहार, सध्या रा. चोळाई पोलादपूर) व त्याचा सहकारी अरविंदकुमार नरसू वास (२०, रा. बिहार, सध्या रा. चोळई पोलादपूर) यांच्यात नदीच्या टोकाला कोण जातो अशी शर्यत लागली होती, मात्र नदीच्या पात्राचा व पाण्याचा अंदाज न आल्याने नदीच्या पलीकडे अडकलेल्या तिसनंदनला वाचविण्यासाठी त्याचा सहकारी अरविंद कुमार हा पाण्यात उतरला असता त्याच्या नाका तोंडात पाणी गेले, त्यामुळे ते बेशुद्ध पडला. याबाबतची माहिती मिळताच पोलादपूर पोलिसांसह स्थानिक नागरिकांनी धाव घेऊन दोरी टाकून या दोन्ही तरुणांना बाहेर काढण्यात यश मिळाले.
पोलादपूर पोलीस ठाण्याचे पोनि प्रकाश पवार, पोह दीपक जाधव , इकबाल शेख, पीएसआय सकपाळ, वार्डे, एस. एन. गोविलकर आदी घटनास्थळी दाखल झाल्यावर घटनेचे गांभीर्य लक्षात घेत स्थानिक रहिवासी स्वप्निल भुवड, सचिन दुदुस्कर, नासिर धामणकर, सिकंदर धामणकर, कल्पेश खाडे, मुस्तफा सावर्डेकर, तनवीर कोंडेकर, फैजान कुडुपकर, मनीष पाटणे आदी तरुणांना वाचविण्यासाठी जीव धोक्यात घालून नदीपात्रात उतरलेले व दोरखंडाच्या साहायाने त्यांना नदीपात्रातून बाहेर काढले. या दोन्ही तरुणांना तातडीने पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र अरविंदकुमार नरसू वासच्या नाका तोंडात जास्त पाणी गेल्याने अधिक उपचारासाठी महाड येथे हलविण्याचे आले असल्याची माहिती सूत्रांनी दिली.