सुरेश लाड यांची राजीनाम्याची तलवार तिसऱ्याच दिवशी म्यान, खासदार सुनील तटकरे यांची मनधरणी आली फळाला

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2021 05:44 PM2021-11-25T17:44:06+5:302021-11-25T17:44:45+5:30

Raigad News: रायगड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा देणारे माजी आमदार सुरेश लाड यांचे बंड तिसऱ्या दिवशी थंड झाले आहे.

Sword of Suresh Lad's resignation came to fruition on the third day | सुरेश लाड यांची राजीनाम्याची तलवार तिसऱ्याच दिवशी म्यान, खासदार सुनील तटकरे यांची मनधरणी आली फळाला

सुरेश लाड यांची राजीनाम्याची तलवार तिसऱ्याच दिवशी म्यान, खासदार सुनील तटकरे यांची मनधरणी आली फळाला

Next

- विजय मांडे  
कर्जत - रायगड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा देणारे माजी आमदार सुरेश लाड यांचे बंड तिसऱ्या दिवशी थंड झाले आहे. आगामी काळात होऊ घातलेल्या नगरपंचायत,नगरपरिषदा आणि जिल्हा परिषद- पंचायत समित्यांच्या निवडणुका सुरेश लाड यांच्या नेतृत्वाखाली लढविल्या जातील, असे खासदार सुनील तटकरे यांनी जाहीर केले. तटकरे यांनी लाड यांची नाराजी दुर करताच लाड यांनी जिल्हाध्यक्ष पदाची धुरा पुन्हा आपल्या खांद्यावर घेत असल्याचे जाहिर केले. थोडक्यात म्हणायचे झाले तर लाड यांनी आपली राजीनाम्याची तलवार म्यान केली आहे.

23 नोव्हेंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा अध्यक्ष सुरेश लाड यांनी आपल्या पदाचा राजीनामा पक्षाच्या मुंबई येथील प्रदेश कार्यालयात पाठवून दिला होता. आज २५ नोव्हेंबर रोजी सुरेश लाड यांना सोबत घेऊन काही प्रमुख पदाधिकारी पनवेल येथे पोहचले. पनवेल येथील एका हॉटेल मध्ये सुनील तटकरे, सुरेश लाड यांच्यात बैठक झाली. त्यावेळी सुरेश लाड यांच्या सर्व बाबीं समजून घेत सुनील तटकरे यांनी आगामी काळात पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडून त्या - त्या विषयांवर सकारात्मक चर्चा केली जाईल असे आश्वासन दिले. आगामी काळात रायगड जिल्हयातील नगरपंचातींच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्यानंतर जिल्ह्यातील दहा नगरपरिषद आणि रायगड जिल्हा परिषद तसेच १५ तालुका पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुका आहेत. ते लक्षात घेता निवडणुकीच्या तोंडावर जिल्हा अध्यक्ष बदलला जाणे हे पक्षाला परवडणारे नाही तसेच कार्यकर्त्यांची निवडणुका लढण्याची उमेद हरवून जाईल आणि म्हणून लाड यांनी पुन्हा जिल्हा अध्यक्ष पदावर काम करावे, अशी सूचना सुनील तटकरे यांनी तेथे उपस्थित असलेले राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत सुरेश लाड यांना केली. यावेळी जेष्ठ नेते हनुमंत पिंगळे, रायगड जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुधाकर घारे,राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस तानाजी चव्हाण, जिल्हा उपाध्यक्ष एकनाथ धुळे, जिल्हा राष्ट्रवादी युवक चे अध्यक्ष अंकित साखरे, कर्जत तालुका अध्यक्ष भगवान चंचे, खालापुर तालुका अध्यक्ष नरेश पाटील, माजी तालुका अध्यक्ष एच के पाटील, विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष संतोष बैलमारे तसेच शरद लाड, संदीप मुंढे, कैलास घारे आदी उपस्थित होते.

सुरेश लाड यांची जिल्हा अध्यक्ष पदावर पुन्हा काम करण्याची मनधरणी करण्यात यशस्वी झाल्यानंतर रायगड जिल्ह्यातील आगामी सर्व निवडणुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जिल्हा अध्यक्ष सुरेश लाड यांच्या नेतृत्वाखाली लढणार असल्याचे तटकरे यांनी जाहीर केले. तटकरे आणि सुरेश लाड म्हणजे एका नाण्याच्या दोन बाजू याचे प्रत्यंतर पुन्हा एकदा सर्वाना अनुभवायला मिळाले. 2019 च्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी आमदार असलेले सुरेश लाड शिवसेनेच्या वाटेवर जात असल्याचे समजताच रात्रीचा दिवस करून तटकरे हे लाड यांच्या भेटीला पाेचले हाेते. सुखम हॉस्पिटलमध्ये  जाऊन तटकरे यांनी लाड यांची मनधरणी केली हाेती. त्यानंतर आता जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा लाड यांना मागे घ्यावा लागला. या घटनांमुळे तटकरेंचे राजकीय कौशल्य कसे आहे. याचा प्रत्तय पुन्हा एकदा आला आहे.

Web Title: Sword of Suresh Lad's resignation came to fruition on the third day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.